निवडणुकीसाठी ४५००पोलिसांचा बंदोबस्त

आयुक्‍त बिष्णोई यांची माहिती : गुन्हे शाखेची सात पथके घालणार गस्त

पिंपरी – आगामी विधानसभा निवडणुका भयमुक्‍त वातावरणात पार पडाव्यात यासाठी साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. याशिवाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांनी दिली.

पोलीस आयुक्‍तालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्‍त सुधीर हिरेमठ उपस्थित होते. यावेळी बोलताना आयुक्‍त म्हणाले, पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीत पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ, खेड-आळंदी, भोर, खडकवासला आणि वडगावशेरी हे आठ मतदार संघ येतात. यामध्ये 417 मतदान केंद्रांवर एक हजार 716 मतदान बुथ आहेत. पोलिसांच्या दृष्टीने 40 बुथ क्रिटीकल आहेत. त्या ठिकाणी होमगार्ड आणि केंद्रीय दलाचे पोलिस कर्मचारी नेमण्यात येणार आहे. तसेच, स्थानिक पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांना त्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

पूर्वी घडलेल्या हिंसक घटनेमुळे मावळ मतदार संघातील तळेगाव येथील केंद्रावर सीआरएफचे अतिरीक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आचारसंहिता भंगाचे एकूण पाच गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी दोन दखलपात्र व एक अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. तसेच भोसरी येथील पैसे वाटपाच्या गुन्ह्यात फिर्यादीच न मिळाल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नाही.

निवडणूक शांततेत पार पडावी, याकरिता एक हजार 112 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. एमपीडीए आणि मोक्का कायद्यान्वये प्रत्येकी दोन कारवाई करण्यात आल्या आहेत. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात 8 लाख 97 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर, 295 प्रोहीबिशन (दारू विरोधी) कारवाई करण्यात आल्या आहेत.

निवडणुकीपूर्वी मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमची सुरक्षा, मतदान यंत्र बुथवर पोहचविणे, निवडणुकीनंतर ती पुन्हा स्टॉंग रूमवर पोचविणे, मतमोजणीच्या दिवशी वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी उभे करणे, यासाठीही वेगळी यंत्रणा राबविण्यात येत आहे. मतमोजणीनंतर कोणालाही विजय मिरवणूक काढू देणार नाही, असे आयुक्‍त बिष्णोई यांनी स्पष्ट केले.

दहा वर्षांतील गुन्हेगारांवर कारवाई – 
भयमुक्‍त वातावरणात निवडणुका पार पडण्यासाठी 24 ठिकाणी पोलिसांनी संचलन केले. शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये 42 ठिकाणी कोम्बिंग राबवण्यात आले. त्यामध्ये दहा वर्षात तडीपाराची मुदत संपलेले 203 आणि सध्या तडीपार करण्यात आलेल्या 106 गुन्हेगाराची तपासणी करण्यात आली. दहा वर्षातील 27 मोका अंतर्गत कारवाई केलेल्या 232 आरोपींची सद्यस्थिती तपासण्यात आली.

“”प्रचार संपल्यानंतर मतदान कालावधीत गस्त घालण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीला गुन्हे शाखेची सात विशेष पथक तैनात करण्यात आले आहेत. ते प्रत्येक परिसरातील बारीक गोष्टीवर लक्ष ठेवणार आहेत. तसेच, यंदा मतदान केंद्राची पाहणी करुन वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.
– संदीप बिष्णोई, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त

असा असेल पोलीस बंदोबस्त

  • पोलीस उपायुक्‍त – 05
  • सहाय्यक आयुक्‍त – 15
  • पोलीस निरीक्षक -60
  • सहाय्यक निरीक्षक/उपनिरीक्षक -239
  • कर्मचारी – 2,892
  • होमगार्ड – 1,200
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.