पुणे – चांदणी चौक येथे रस्ता रुंदीकरण आणि सेवा रस्त्या तयार करण्यासाठी टेकडी फोडण्याचे काम सुरु आहे. मात्र कठीण खडकामुळे दगड फोडण्यास वेळ लागत आहे. अत्याधुनिक यंत्रे लावून सुध्दा कठीण खडकामुळे या कामास अपेक्षित प्रगती साधता येत नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नियंत्रित स्फोट करून खडक फोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दि.10 ऑक्टोंबरपासून हे काम पूर्णहोईपर्यंत दररोज मध्यरात्री 12.30 ते 1 वाजेपर्यंत अर्ध्या तासासाठी चांदणी चौक येथील सर्व बाजूची वाहतूक बंद राहणार आहे.
चांदणी चौक येथील पूल दि.2 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पाडण्यात आला. त्यानंतर दि.9 ऑक्टोबरपर्यंत मार्गिका विस्तार आणि सर्व्हिस रोडचे काम होणे अपेक्षित होते. मात्र, दिवस-रात्र करूनही या वेळेत हे काम पूर्ण शक्य झाले नाही. सध्या चांदणी चौकात मुंबई-सातारा मार्गिकेच्या बाजूची टेकडी फोडण्यात येत आहे. त्यासाठी आतापर्यंत तीन -चार वेळा महामार्ग बंद करून सुरुंग लावण्यात आला. येथील जुना पूल पाडून आठ दिवस उलटले आहेत. मात्र, त्यानंतरही येथील टेकडी पूर्णपणे फोडता आलेली नाही. अद्याप सातारा-मुंबई मार्गिकेच्या बाजूची (मुळशीची बाजू) टेकडी फोडण्यास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या कामाला अधिक दिवस लागण्याची शक्यता आहे.
चांदणी चौकातील खडक फोडण्यासाठी सुरुंग लावणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक वेळी वाहतूक काही वेळ बंद ठेवावी लागणार आहे. एका बाजूला वाहतुकीची कोंडी आणि दुसऱ्या बाजूला पाऊस यावर मात हे काम सुरु आहे. परिणामी, टेकडी फोडून सर्व्हिस रस्ता तयार करण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
“सद्यस्थितीत जुन्या पुलाच्या ठिकाणी साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या तीन लेन व मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या साडे चार लेन उपलब्ध करून देण्यात आल्या असून चांदणी चौक भागातील वाहतूक कोंडीची समस्या काही अंशी कमी झाली आहे. वाहतुकीच्या बदलाची नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस.एस. कदम यांनी केले आहे.”