लक्षवेधी: निर्णायक टप्प्यावर अण्णा द्रमुक!

अर्धशतकी वाटचाल पूर्ण केल्याचा जल्लोष करतानाच अण्णा द्रमुकसमोर याच टप्प्यावर राजकीय अस्तित्वाचे संकट उभे राहावे हा विचित्र विरोधाभास म्हटला पाहिजे. एखाद्या राजकीय पक्षाचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असताना तो पक्ष सत्तेत असेल तर त्या प्रसंगाला अधिक झळाळी प्राप्त होते. अर्थात, सत्तेत असो अथवा नसो; कोणताही राजकीय पक्ष आपली पन्नाशी गाठतो तेव्हा त्या पक्षाच्या वाटचालीचा डोळा घेणे आवश्‍यक ठरते. याचे कारण पन्नास वर्षांचा कालावधी हा तसा छोटा नाही.

इतक्‍या कालावधीत अनेक पक्ष नामशेषही होऊ शकतात किंवा प्रबळही होऊ शकतात. अर्धशतकी वाटचाल पूर्ण करणारा अण्णा द्रमुक पक्ष हा आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यात अद्यापी यशस्वी ठरला आहे. तथापि, अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला सत्तेपासून वंचित राहावे लागले. एवढेच नव्हे तर नुकत्याच पुनर्रचना झालेल्या नऊ जिल्ह्यांत ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या त्यांतही सत्ताधारी द्रमुकने मुसंडी मारली, तर अण्णा द्रमुकच्या पारड्यात अपयश आले.

एम. जी. रामचंद्रन हे तामिळनाडू चित्रपटसृष्टीतील गाजलेले अभिनेते होते. तामिळनाडूच्या राजकारणात तेथील चित्रपटसृष्टीतून आलेल्या अनेकांचा मोठा दबदबा राहिला. द्रमुकचे सर्वेसर्वा मानले गेलेले करुणानिधी हे तामिळ चित्रपटांचे पटकथालेखक होते. द्रमुकचे नेते म्हणून करुणानिधी यांनी मोठे योगदान दिले. एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) हेही द्रमुकमध्येच होते. अण्णादुराई यांच्या निधनानंतर पक्षात भ्रष्टाचार सुरू असल्याचा एमजीआर यांनी गंभीर आरोप केला.

साहजिकच एमजीआर यांची द्रमुकमधून हकालपट्टी करण्यात आली आणि आपली वेगळी वाट तयार करण्यावाचून एमजीआर यांच्यासमोर पर्याय राहिला नाही. अर्थात तामिळ चित्रपटसृष्टीत एमजीआर यांनी अभिनेता म्हणून नाव कमावले होते आणि त्याचे वलय त्यांना राजकारणासाठी लाभदायी ठरले. द्रमुकमधून हकालपट्टी झाल्यावर एमजीआर यांनी नव्या पक्षाची स्थापना 1972 साली केली आणि त्याचे नाव अण्णा द्रमुक असे ठेवले. 17 ऑक्‍टोबर 1972 रोजी या पक्षाचा जन्म झाला. यंदा हा पक्ष सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रवेश करीत आहे. तेव्हापासून आजतागायत या पक्षाने अनेक चढ-उतार पाहिले आहेत.

सत्ता मिळविली आहे आणि अनेक आव्हानांचा सामना केला आहे. सुरुवातीच्या काळात या पक्षाकडे एमजीआर यांचे नेतृत्व हेच सर्वात प्रभावी शस्त्र होते. 1977 साली या पक्षाने विधानसभा निवडणुका लढविल्या. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष अशा पक्षांशी अण्णा द्रमुकने आघाडी केली. पहिल्याच निवडणुकीत अण्णा द्रमुक आघाडीने 234 पैकी तब्बल 144 जागा जिंकल्या आणि एमजीआर मुख्यमंत्री झाले. पदार्पणात मिळालेले हे यश उल्लेखनीय होतेच; पण द्रमुकला एका नव्या पक्षाने दिलेला धक्‍का देखील मोठा होता.

अण्णा द्रमुकचा प्रमुख विरोधक द्रमुक हाच होता आणि या दोन प्रबळ प्रादेशिक पक्षांनी तामिळनाडूतील राजकीय पैस व्यापून टाकला आणि कॉंग्रेससह अन्य पक्ष बाजूला फेकले गेले. 1977 मध्ये मुख्यमंत्री झालेल्या एमजीआर यांचे सरकार द्रमुकच्या हट्टावरून तत्कालीन केंद्र सरकारने 1980 साली बरखास्त केले. 1980 सालच्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचा पराभव करून इंदिरा गांधी यांचे सत्तेत पुनरागमन झाले होते आणि त्यामुळे तामिळनाडूत निवडणुका घेतल्या तर द्रमुक आणि कॉंग्रेस सत्तेत येऊ शकतील हा द्रमुकचा होरा होता. पण तो सपशेल चुकला. एमजीआर हयात असेपर्यंत त्यांनी अण्णाद्रमुकला पराभूत होऊ दिले नाही. 1987 साली त्यांचे निधन झाले तेव्हाही ते मुख्यमंत्रिपदावर होते.

एमजीआर यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये सत्ता संघर्ष पेटला. विशेषतः एमजीआर यांचा राजकीय वारसा हा त्यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांच्याकडे जाणार की रामचंद्रन यांनी ज्यांना राजकारणात आणि अण्णा द्रमुकमध्ये आणले होते त्या जयललिता यांच्याकडे जाणार यावरून हा संघर्ष होता. जानकी रामचंद्रन या एमजीआर यांच्या निधनानंतर काही आमदारांच्या बळावर मुख्यमंत्री झाल्याही; पण पक्षात फूट पडली आणि अखेरीस पुरेशा पक्षांतर्गत पाठिंब्याअभावी जानकी रामचंद्रन पिछाडीस पडल्या आणि जयललिता या अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा झाल्या.

जयललिता यांना देखील अभिनेत्री म्हणून वलय होतेच. त्या आपल्या या वलयाच्या आणि लोककल्याणकारी योजनांच्या आधारावर अण्णाद्रमुकला सत्तेत पोचविण्यात यशस्वी ठरल्या. अर्थात द्रमुकचे नेते करुणानिधी आणि अण्णा द्रमुकच्या नेत्या जयललिता यांच्यातून विस्तव जात नसे आणि राजकीय मतभेदांना अनेकदा वैयक्‍तिक द्वेषाचे रूप येई. त्यातच जयललिता यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले. तरीही अण्णा द्रमुकला जयललिता यांनी सत्तेत पोहोचविले आणि 2016 च्या विधानसभा निवडणुकीत त्या सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्या.

तामिळनाडूत सलग दुसऱ्यांदा कोणत्याच पक्षाला सत्ता मिळत नाही या प्रघाताला जयललिता यांनी सुरुंग लावून दाखविला. अर्थात, त्यानंतर काहीच महिन्यांत जयललिता यांचे निधन झाले आणि अण्णा द्रमुकसमोर पुन्हा नेतृत्वाचा प्रश्‍न उपस्थित झाला. जयललिता यांच्यासारखा करिष्मा असणारे नेतृत्व अण्णा द्रमुककडे नाही; तरीही आहे ती सत्ता गटबाजी वरचढ होऊ न देता टिकवून धरण्यात पनीरसेल्व्हम आणि पलानीसामी यांनी यश मिळविले. याचे एक कारण हेही होते की करुणानिधी यांच्या निधनानंतर द्रमुकचे प्रमुख झालेले स्टॅलिन यांनी आपण निवडणुकीत विजय प्राप्त करूनच सत्ता मिळवू; आहे ते सरकार पाडण्यात आपल्याला स्वारस्य नाही अशी घेतलेली भूमिका. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकने सत्ता मिळविली आहे आणि अण्णा द्रमुक ऐन सुवर्णमहोत्सवी वर्षात विरोधी बाकांवर पोहोचला आहे.

आता अण्णा द्रमुक विचित्र टप्प्यावर उभा आहे. एमजीआर किंवा जयललिता यांच्यासारखा करिष्मा असणारा नेता नाही; शशिकला यांच्या पक्षावर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नांमुळे पक्षात निर्माण होणाऱ्या दरीची भीती आहे; द्रमुकला आव्हान देण्यासाठी अण्णा द्रमुककडे ठोस व्यूहनीती नाही. तेव्हा कोणत्याच आघाडीवर फारसे अनुकूल चित्र नसताना अण्णा द्रमुकसमोर 2024 च्या लोकसभा निवडणुकांत मोठी विवंचना उभी राहू शकते.

लक्षवेधी
राहुल गोखले

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.