श्रीगोंदा -मुस्लिम समाजासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शब-ए-बारात कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने मुस्लीम समाजाला महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शिवाय शहरातील कब्रस्तानजवळ पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असून, सर्वांनी या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी केले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी शासकीय नियमांचे पालन करावे. कुणीही घराबाहेर पडू नये. तसेच अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने तेथेही गर्दी करू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या संदर्भात मुस्लिम धर्मगुरू मैलाना महिनुद्दीन अत्तार व मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी असिफ पठाण यांच्याशी प्रतिनिधीक स्वरूपात चर्चा जाधव यांनी केले. शब-ए-बारातची नमाज सर्वांनी आपल्या घरीच पठण करावी. शिवाय कब्रस्तानमध्ये कोणीही जाऊ नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे जाधव यांनी सांगितले.
दुकानात गर्दी झाल्याने कारवाई
सर्वत्र लॉकडाऊन असल्याने दुकाने बंद आहेत. अशातच पेडगाव (ता. श्रीगोंदा) येथील एक सलून सुरू होते. संबंधिताला ताब्यात घेऊन श्रीगोंदा पोलिसांनी कारवाई केली. शिवाय शहरातील एका मोठ्या किराणा दुकानात गर्दी झाली होती. त्यावरून दुकानदारास पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
वृद्धाचा अहवाल निगेटिव्हच
श्रीगोंदा तालुक्यातील 85 वर्षांच्या एका वृद्ध व्यक्तीस करोना संशयीत म्हणून घोषीत करण्यात आले होते. त्यांच्या स्त्राव चाचणीचा अहवाल आला असून, ते करोना निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे. दरम्यान श्रीगोंद्यातील अजून एक महिला करोना संशयीत असून, या महिलेचा स्त्राव अहवाल अद्याप आलेला नाही.