नवीन 18 संशयित विलगीकरण कक्षात दाखल
सातारा – जिल्ह्यात 6 एप्रिल रोजी रात्री उशिरा दाखल असलेल्या 32 संशयित रुग्णांचे व दि. 7 एप्रिल रोजी कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असलेल्या सात संशयित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर जिल्ह्यात 18 नवीन संशयित विलगीकरण कक्षात दाखल झाले आहेत.
या 39 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे पुण्यातील “एनआयव्ही’ संस्थेने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. जिल्हा रुग्णालयात 1 ते 60 वर्ष वयोगटातील 18 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
यामध्ये 1 ते 55 वयोगटातील दोन पुरुष व तीन महिला असे पाच नागरिक श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे व कोविड-19 बाधीत रुग्णाचे निकट सहवासातील 20 ते 60 वर्ष वयोगटातील 13 नागरिकांचा समावेश आहे.या सर्व रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुण्यातील “एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.