नगर – माजीमंत्री व भाजप राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी डावलण्यात आल्याने मुंडे समर्थक आक्रमक झाले असून जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात एका समर्थकाने चक्क विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या समर्थकास वेळीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.
पाथर्डी येथील पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद भास्कराव गर्जे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. भाजपकडून पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलले जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे यांना उमेदवारी दिली नाही. याचा निषेध करीत मुकुंद गर्जे यांनी कीटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गर्जे यांना उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मुकुंद गर्जे यांनी आज सोशल मीडियात एक पोस्ट केली. पंकजा यांच्यासाठी आपण जीव द्यायला तयार आहोत, अशा आशयाची ती पोस्ट होती. त्यामुळे प्रसारमाध्यामांच्या काही प्रतिनिधींनी यासंबंधी त्यांची भेट घेतली. त्यांना प्रतिक्रिया देत असतानाच गर्जे यांनी जवळची बाटली काढून तोंडाला लावली. त्यावेळी उपस्थितांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्याकडील बाटली काढून घेण्यात आली. मात्र तोपर्यंत काही औषध पोटात गेले होते. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी डावल्यानंतर मुंडे समर्थकांकडून जाहीर नाराजी व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर भाजप नेत्यांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.