पिंपरी – चोरट्यांनी तळवडे येथील महाराष्ट्र बॅंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. 28) रात्री दीड ते सव्वा दोन वाजताच्या सुमारास घडली. यापूर्वीही चिखली पोलीस ठाण्याच्याच हद्दीत आठ दिवसांपूर्वी रत्नाकर एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता.
अरविंद मुकुंदराव वायकुळे (वय 58, रा. बावधन खुर्द, पुणे) यांनी सोमवारी (दि. 28) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तळवडे मधील गणेशनगर येथे महाराष्ट्र बॅंकेचे एटीएम आहे. सोमवारी मध्यरात्री दीड ते सव्वा दोन वाजताच्या सुमारास चोरट्यांनी एटीएमचे डिस्प्ले युनिट, कॅश डोअरचे व एसएनजी लॉकचे नुकसान केले. तसेच मशीनमधून रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला.
गेल्या आठवड्यात 22 जून रोजी चिखली प्राधिकरण येथील रत्नाकर बॅंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. या गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नसताना एटीएममध्ये चोरीचा हा दुसरा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही ठिकाणी चोरीचा प्रयत्न करणारा आरोपी स्थानिक असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.