मुझफ्फरनगर – उत्तरप्रदेशातील आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार जोगिंदर सिंग यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी फेटाळण्यात आला.
त्यामुळे नाराज झालेल्या सिंग यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सिंग यांना वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. लष्करी सेवेतून निवृत्त झालेल्या सिंग यांना आपने उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मीरापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला. मात्र, अर्जात काही त्रुटी असल्याने तो फेटाळण्यात आला.
त्यामुळे निराश झालेल्या सिंग यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे तो अयशस्वी ठरला. त्यानंतर सिंग यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले. अर्जातील चूक दुरूस्त करण्याची संधी देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला.