“पुन्हा 26/11 सारखा हल्ला जवळपास अशक्‍य”

नवी दिल्ली – मागील काही वर्षांत राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्यात आली आहे. त्यामुळे भारतात पुन्हा 26/11 सारखा हल्ला घडवणे जवळपास अशक्‍य आहे, अशी ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 नोव्हेंबर 2008 या दिवशी मुंबईवर महाभयंकर हल्ला केला. 26/11 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या हल्ल्याला गुरूवारी 12 वर्षे पूर्ण झाली. त्याचा संदर्भ देऊन राजनाथ येथे एका कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कधीच देशाचा स्वाभिमान, देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व यांच्याशी तडजोड करणार नाही.

आता आपला देश दहशतवाद्यांच्या दृष्टीने सोपे लक्ष्य राहिलेला नाही. आता दहशतवादाविरोधात देशांतर्गत ठोस पाऊले उचलली जातात. गरज भासल्यास आपले शूर जवान सीमा ओलांडून कारवाई करतात, असे म्हणत त्यांनी भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानी हद्दीत घुसून दहशतवादी अड्डे उद्‌धवस्त केल्याच्या घटनेकडे लक्ष वेधले. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असे नमूद करत त्यांनी पाकिस्तानला कडक संदेश दिला.

चीनी कुरापतींमुळे सीमेवर निर्माण झालेल्या तणावाविषयीही राजनाथ यांनी भूमिका मांडली. सीमेचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न झाल्यास आवश्‍यक ती पाऊले उचलण्याची मोकळीक सुरक्षा दलांना देण्यात आली आहे. भारताची एक इंच भूमीही कुणी बळकावू शकत नाही, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.