बांदा – उत्तरप्रदेशातील गुंड अतिक अहमद आणि त्याच्या भावाची काल हत्या करण्यात आली. त्यांचे तीन मारेकरी पकडले गेले आहेत. त्यातील एका आरोपीच्या वडिलांनी सांगितले की आपला मुलगा बेरोजगार होता व मादकद्रव्यांचा व्यसनी होता. मारेकरी लवलेश तिवारी याचे वडिल यग्य तिवारी यांनी पत्रकारांना सांगितले की, काल मी टीव्हीवर ही घटना पाहिली.
आमचा त्याच्याशी बरेच दिवस संबंध नव्हता. त्याने हे कृत्य का केले याची आम्हाला कल्पना नाही. तो आमच्या कुटुंबाबरोबर राहात नव्हता. तो पाच सहा दिवसांपुर्वी आमच्या घरी आला होता. त्याच्या विरोधात काहीं गुन्हे दाखल आहेत. तेव्हापासून आम्ही त्याच्याशी संबंध तोडले होते. तो पुर्ण बेरोजगार होता आणि मादक द्रव्यांचेही तो व्यसन करायचा असे त्यांनी सांगितले.
दुसरा मारेकरी सनी सिंह याचा भाऊ पिंटू सिंह याने सांगितले की, सनी सुद्धा बेरोजगार होता, तो काहीही काम धंदा न करता इकडेतिकडे हिंडत असायचा. तो आमच्या बरोबर राहात नव्हता. तो गुन्हेगार कसा बनला याची आम्हाला कल्पना नाही. कालच्या घटनेबद्दलही आम्हाला काहीही कल्पना नाही.
दरम्यान काल पत्रकारांच्या समक्षच ही हत्या झाली. त्यावेळी झालेल्या झटापटीत एक पत्रकारही जखमी झाला असून एका पोलिस कर्मचाऱ्यालाही गोळी लागली आहे असे पोलिसांनी सांगितले. या तिन्ही आरोपींचा या हत्येत का सहभाग होता याची अजून माहिती उपलब्ध झालेली नाही. आपल्याला अतिक अहमदपेक्षाही मोठा गुन्हेगार व्हायचे आहे म्हणून आम्ही ही हत्या केल्याची कबुली या आरोपींनी पोलिसांना दिली असल्याची माहिती काही प्रसारमाध्यमांनी दिली आहे.