यावेळी कुणाच्या पारड्यात ?

हिंगोली : मतदारसंघ

हिंगोली लोकसभा मतदारसंघात कोणत्या एकाच पक्षाचा ताबा दीर्घकाळ राहिलेला नाही. कधी कॉंग्रेस, कधी राष्ट्रवादी कॉंग्रेस तर कधी शिवसेनेच्या पारड्यात या मतदारसंघाने आपला कौल टाकला आहे. गेल्या वेळी म्हणजे 2014च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार राजीव सातव केवळ 1632 मतांनी निवडून आले होते. त्यावेळी थोडक्‍यात चुकलेला विजय मिळवण्यासाठी यावेळी शिवसेना आकाशपाताळ एक करणार हे तर नक्‍कीच आहे…..

मोदी लाटेतही सातव यांनी विजय मिळवला याचेच कौतुक त्यावेळी झाले होते. या लोकसभा मतदारसंघात नेहमी तिरंगी लढत पहायला मिळाली आहे. कधी बहुजन समाज पक्ष तर कधी भारतीय रिपब्लिकन पक्षाने इथे कॉंग्रेस आणि शिवसेनेचे समीकरण बिघडवले आहे. यावेळी प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी निवडणूक रिंगणात आहे. 2014 मध्ये राजीव सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांचा पराभव केला होता. तर त्या आधी 2009 मध्ये सुभाष वानखेडे जिंकले होते. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सूर्यकांता पाटील यांचा पराभव केला होता.

हिंगोली लोकसभा मतदारसंघ 1977 पासून अस्तित्वात आला. 1977 च्या निवडणुकीत जनता पक्षाची लाट होती. त्यावेळी या मतदारसंघातून जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील निवडून आले. त्यानंतर झालेल्या 1980, 1984 आणि 1989 या तीनही निवडणुकींत कॉंग्रेसने इथे बाजी मारली. उत्तम राठोड हे त्यावेळी सलग तीन वेळा विजयी झाले. त्या वेळी हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला बनला. पण 1991 मध्ये येथे बदल झाला. 1991 आणि 1996 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने कॉंग्रेसला पराभूत करत येथे पाय रोवले. 1991 मध्ये शिवसेनेचे विलास गुंडेवार आणि 1996 मध्ये शिवसेनेचेच शिवाजी माने यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती.

1998 च्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या सूर्यकांता पाटील यांनी शिवसेनेच्या शिवाजी माने यांचा पराभव केला. पण 1999 मध्ये शरद पवार यांनी कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली तेव्हा सूर्यकांता पाटीलही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आल्या. पण 1999 च्या निवडणुकीत त्यांना विजय मिळवता आला नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील मतविभागणीचा फायदा शिवसेनेला मिळाला आणि शिवसेनेचे शिवाजी माने पुन्हा एकदा निवडून आले. त्यानंतर या मतदारसंघात सातत्याने बदल होत राहिले.

2004च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सूर्यकांता पाटील या पुन्हा निवडून आल्या. 2009मध्ये शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांनी पुन्हा एकदा हा मतदारसंघ खेचून आणला. 2014 मध्ये संपूर्ण देशात जबरदस्त मोदी लाट होती. त्या परिस्थितीत हिंगोली मतदारसंघाने मात्र वेगळा निकाल दिला आणि आपली बदलाची परंपरा कायम राखली. त्यावेळी सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांचा पराभव केला. 2014 च्या निवडणुकीत जवळजवळ 8 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आणि त्याचा फटका कॉंग्रेस आणि शिवसेना दोघांनाही बसला.

2019च्या निवडणुकीची स्थितीही काही वेगळी नाही. याही वेळी मुख्य लढत शिवसेनेचे हेमंत पाटील आणि कॉंग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्यात असली तरी निवडणूक रिंगणात आणखी 13 अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यातील सहा अपक्ष उमेदवार सुभाष वानखेडे असे नाव असलेलेच आहेत. याचा फटका आता कॉंग्रेसच्या सुभाष वानखेडेंना बसतो की काय अशी भीती कॉंग्रेसच्या गोटात निर्माण झाली आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. जिल्हाप्रमुख ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास असून हिंगोली मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार जयप्रकाश मुंदडा हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक होते. पण नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांनी यावेळी बाजी मारली आहे.

कॉंग्रेसतर्फे या वेळी राजीव सातव यांनाच उमेदवारी मिळेल अशी स्थानिक कॉंग्रेस कार्यकर्त्यांना खात्री होती. पण कॉंग्रेसमध्ये नुकत्याच प्रवेश केलेल्या सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यातून अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षावर आपला वचक आहे हे दाखवून दिले. सुभाष वानखेडे सगळे पक्ष फिरून आले आहेत, त्यांना यावेळी जनता कसा कौल देते हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. सुभाष वानखेडे तीस वर्षे शिवसेनेत होते. 1995, 1999 आणि 2004 मध्ये ते शिवसेनेचे आमदार होते तर 2009 मध्ये शिवसेनेचे खासदार. 2014 मध्ये निवडणुकीत पराभूत झाल्यावर ते भाजपत गेले. तेथे साडेचार वर्षे राहून आता ते कॉंग्रेसवासी झाले आहेत.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. हिंगोली जिल्हा वीस वर्षांपूर्वी तयार झाला. यात हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव असे पाच तालुके या जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यातील समस्या आहेत तशाच आहेत. शिक्षणाच्या, रोजगाराच्या समस्या कायम आहेत. या जिल्ह्यात कोणतीही सिंचन योजना नाही की एखादी जिल्हा मध्यवर्ती बॅंकही नाही.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही येथील सर्वात मोठी आणि महत्त्वाची समस्या आहे. गेली पाच वर्षे राजीव सातव येथील खासदार आहेत. आपल्या जाहीरनाम्यात त्यांनी अनेक आश्‍वासने दिली होती. पण त्यांची पूर्तता त्यांना करता आलेली नाही. उद्योगाचे जाळे आपण उभे करू, शेतीवर आधारित उद्योग आणले जातील, औंढा नागनाथला तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्यात येईल अशी अनेक आश्‍वासने त्यांनी दिली होती. पण कुठलेच आश्‍वासन त्यांनी पूर्ण केले नाही. त्यामुळे येथील समस्या जैसे थे आहेत. यावेळी निवडणुकीत हिंगोली आपली बदलाची परंपरा कायम ठेवतो का याकडे आता सगळ्यांचे लक्ष आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.