काय सांगताय? वय वर्षे 70, उमेदवारीही पहिल्यांदाच आणि मतदानही !

लोकसभेच्या या देशभरात चालणाऱ्या महाउत्सवामध्ये असंख्य प्रकारच्या लोकांचे नव्याने “दर्शन’ घडते. आता हेच पहा, पश्‍चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे एक उमेदवार यंदाच्या निवडणुकांमध्ये केवळ पहिल्यांदा रिंगणात उतरलेले नाहीत, तर मतदार म्हणूनही त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. बारासात लोकसभा मतदारसंघात भाजपाने 70 वर्षीय डॉक्‍टर मृणाल कांती देबनाथ यांना उमेदवारी दिली आहे.

ते पहिल्यांदाच आपल्या मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. देबनाथ हे 1947 नंतर प्रदीर्घ काळ अमेरिका, युरोप आणि कॅरेबियन बेटांवरच राहिले. जवळपास दहा वर्षांपूर्वी ते भारतात परतले आहेत. 18 वर्षांचे असताना ते आपल्या आईवडिलांबरोबर मतदान करण्यासाठी गेले होते. पण स्थानिक गुंडांनी त्यांना तुमचे मत टाकले गेले आहे, असे सांगून हुसकावून पळवून लावले.

साहजिकच या घटनेमुळे ते प्रचंड निराश झाले. त्यानंतर त्यांनी एकदाही मतदान केलेले नाही. अर्थात विरोधी पक्ष देबनाथ यांच्या या म्हणण्यावर विश्‍वास ठेवण्यास तयार नाहीत. डॉ. देबनाथ पूर्व पाकिस्तानमधील खुलना जिल्ह्यामध्ये जन्मास आले. 1964 मध्ये त्यांचे कुटुंब उत्तर 24 परगण्यात येऊन स्थिरस्थावर झाले. शिक्षण पूूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रसंगी बस क्‍लीनरची नोकरीही केली. मात्र शिक्षणाची जिद्द इतकी होती की या जोरावर त्यांनी एमबीबीएसची पदवी मिळवली आणि उच्च शिक्षणासाठी परदेशात निघून गेले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.