संगमनेर, (प्रतिनिधी) – भक्ष्याचा पाठलाग करत असताना हुलकावणी दिल्याने प्रतापपूर (ता. संगमनेर) येथील गावठाण हद्दीतील विहिरीत बिबट्या पडला होता. अथक प्रयत्न करूनही बाहेर येता न आल्याने हा बिबट्या पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर गावातील गावठाण हद्दीतील मारुती आणि विठ्ठल मंदिराजवळ भारत सयाजी इलग यांची विहीर आहे. मंगळवारी (दि.२७) रात्री भक्ष्याचा पाठलाग करत असताना भक्ष्याने हुलकावणी दिल्यामुळे एक बिबट्या विहिरीत पडला होता. बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शेजारील वस्तीवर राहत असलेल्या महिलांना बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला.
त्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीत उतरण्यासाठी लावण्यात आलेल्या कड्यांचा आधार घेऊन बिबट्या आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
ही बातमी वार्यासारखी पसरल्याने घटनास्थळी दाखल झालेल्या गावातील तरुणांनी प्लास्टिकचे कॅरेट दोरीच्या साह्याने विहिरीत सोडत बिबट्याला आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्याच्या शरीरात त्राण शिल्लक न राहिल्याने अखेर तो पाण्यात बुडाल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली आहे.