नीरा आरोग्य केंद्रातील प्रकार ः रुग्णांचे होतात हाल
नीरा- नीरा आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसल्याने नीरा येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेचे बाळंतपण खासगी दवाखान्यात करावे लागले. त्यामुळे आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी उपचाराला चाललायं…! जरा जपून अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
पुरंदर तालुक्यातील सुसज्ज असलेल्या नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या पंधरा दिवसांपूर्वी नीरा येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील गरोदर महिलेने तपासणी करून घेतली होती. त्यावेळी संबंधित महिलेला बाळंतपणास पंधरा दिवस वेळ असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर त्या महिलेने रविवारी (दि. 12) नीरा आरोग्य केंद्रात तपासणी करण्याकरिता गेली असता तिला तुम्ही बारामती येथील दवाखान्यात बाळंतपणासाठी नावनोंदणी करा, असा सल्ला देण्यात आला म्हणून त्या महिलेने बारामती येथील दवाखान्यात सोमवारी (दि. 13) बाळंतपणासाठी नावनोंदणी केली. मात्र, मंगळवारी (दि.14) पहाटे चार वाजता संबंधित महिलेला त्रास होत असल्याने तिच्या कुटुंबीयांनी नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्यावेळी आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने ड्युडीवर असलेल्या नर्सने संबंधित महिलेच्या कुटुंबीयांना जेजुरी येथे जाण्यास सांगितले. परंतु त्या महिलेला जादा त्रास होऊ लागल्याने तिच्या कुटुंबीयांनी त्या महिलेला नीरा येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. काही वेळातच त्या महिलेचे सुस्थितीत नॅरमल बाळंतपण झाल्याने त्या महिलेने सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान, शासन महिलांना सरकारी दवाखान्यात बाळंतपण करण्यासाठी प्रोत्साहन देत असताना मात्र नीरा आरोग्य केंद्रात डॉक्टरांअभावी गरिब कुटुंबातील महिलेला खासगी दवाखान्यात बाळंतपण करावे लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच संबंधित नागरिकांनी डॉक्टरांची चौकशी करण्याची मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे. नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभाराची दिवसभर नीरा गावांत चर्चा सुरू होती.
- नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी (दि.14) डॉक्टर नसल्याची तक्रार आली असून आरोग्य केंद्राच्या कारभाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.पुणे.