पुणे : चांगली नोकरी लावण्याच्या अमिषाने सुरक्षारक्षकाकडील गाडी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.14) पुणे स्टेशन परिसरात घडला. याबाबत दिलीप डावरे (41, रा. लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे लोहगाव येथील एका सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीस आहे. 14 जानेवारी रोजी त्यांना एक 45 वर्षाचा व्यक्ती भेटाला. त्याने त्यांना सिक्युरिटीमध्ये अधिक चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने त्यांची मोपेडगाडी डीकीत ठेवलेल्या मुळ कागदपत्रासह नेली.
परंतु, त्याने गाडीही परत केली नाही आणि नोकरीही लावली नाही. दरम्यान फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर डावरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली.