पुणे – प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात सकाळी 8:30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला . उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. यातच आता शरद पवार यांनी देखील ना. धों. महानोर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
शरद पवार यांनी ट्वीट करत लिहिले की, “माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धो. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी , जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत.”
पुढे शरद पवारांनी लिहिले की, “ना. धो. खूपच हळवे , त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी , प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लावून जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.”
माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे… pic.twitter.com/SF42UsISfp
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 3, 2023
दरम्यान, ना.धों. महानोर यांची ‘पानझड’, ‘तिची कहाणी’, ‘रानातल्या कविता’ गाण्यांमधून पळसखेडची मराठवाडी लोकगीते प्रसिद्ध केली. ‘मी रात टाकली, मी कात टाकली’ ही त्यांच्या लोकप्रिय गीतांपैकीच एक रचना आहे. त्यांचा ‘रानातल्या कविता’ हा कवितासंग्रह खूप गाजला होता. स्वत: शेतकरी असल्याने निसर्ग, शेतीविषयी असलेले प्रेम त्यांच्या कवितेतून झळकायचे. महानोरांच्या पार्थिवावर उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.