महिला शिक्षकांवर सहाय्यक मतदान केंद्राध्यक्षाचा भार

नगर: विधानसभेच्या निवडणूकीत सर्व शिक्षक संघटनांनी महिला शिक्षकांना स्थानिक पातळीवर नियुक्त्या देण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत निवडणूक शाखेने मात्र अनेक ठिकाणी महिला शिक्षिकांना सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष म्हणून निवडणुकीचे अतिरिक्त काम देण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये निवडणूक नियुक्ती आदेशाचे वाटप आज करण्यात आले. यामध्ये पदवीधर महिला शिक्षकांना केवळ त्यांची शैक्षणिक पात्रता पाहून सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम देण्यात आले आहे. याबद्दल जिल्ह्यातील महिला शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आत्तापर्यंत सदरचे काम हे विविध खात्यातील अधिकारी तसेच माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना दिले जात होते. मात्र यावेळी जिल्ह्यातील बहुतांश महिला प्राथमिक शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.

सध्या जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी निवडणूक प्रशिक्षणाचे सत्र सुरू असून अनेक ठिकाणी महिला शिक्षकांनी आम्हाला स्थानिक पातळीवर व शाळेपासून जवळच्या ठिकाणी काम द्यावे. तसेच मतदान अधिकारी क्रमांक दोन किंवा तीन चे काम द्यावे, अशी मागणी केलेली होती. निवडणुकीशी संबंधित प्रांताधिकारी,निवडणुकअधिकारी यांनी सुद्धा याबाबत निश्चित विचार करण्याचे आश्‍वासन दिलेले होते. मात्र आज वितरीत झालेल्या निवडणूक कामाच्या आदेशामध्ये जिल्ह्यातील अनेक महिला प्राथमिक शिक्षकांना सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष चे काम सोपविण्यात आल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. सदरचे काम जबाबदारीचे असून या पदाला मतदान केंद्राध्यक्षा बरोबर काम करावे लागते. त्यामुळे सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष पदी दिलेल्या नियुक्त्या रद्द कराव्यात अशी मागणी जिल्ह्यातील महिला शिक्षकांनी केली असून यासंदर्भात शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.


नियुक्त्या करताना वशिलेबाजी          

जिल्ह्यांमध्ये निवडणूकीसाठी कर्मचारी नियुक्त करताना संबंधित तहसील कार्यालयातील निवडणूक टेबल चे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ओळखीचा फायदा देत अनेक शाळांमधून कर्मचाऱ्यांना वगळले आहे. निवडणूक शाखेने प्रत्येक शाळेतून कार्यरत शिक्षकांची यादी संबंधित कार्यालयाकडून मागविली होती. मात्र काही शिक्षक कर्मचाऱ्यांचे निवडणूक शाखेतील कर्मचाऱ्यांशी असलेल्या ओळखीचा फायदा देत नियुक्त्या देण्यात आल्या नाहीत . काही ठिकाणी महिला शिक्षिकांचे अडचणी लक्षात न घेता त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. याबाबत काही शिक्षकांनी पुराव्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

ReplyForward

Leave A Reply

Your email address will not be published.