मुंबई – मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मनासारखे खाते न मिळाल्याने नाराज झालेले कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा रूसवा आता दूर झाला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्ली दरबारी धाव घेऊन वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर वडेट्टीवारांना शिवसेनेकडील मदत व पुनवर्सन खाते देण्यात आले आहे. वडेट्टीवारांनी शुक्रवारी नव्या खात्याचा पदभार स्विकारला असून सोमवारपासून कामाला सुरूवात करणार आहेत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिलेल्या वडेट्टीवार यांचा ठाकरे मंत्रिमंडळात वैॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला आहे. आपल्याला ऊर्जा खाते मिळावे, अशी त्यांची मागणी होती. मात्र, हे खाते नितीन राऊत यांच्याकडे गेले. वडेट्टीवार यांना दुय्यम मानली जाणारी इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खारजमिन विकास आणि भूकंप पुनर्वसन ही खाती मिळाली. अपेक्षित खाते न मिळाल्याने वडेट्टीवार हे नाराज होते. त्यामुळे खातेवाटपानंतर त्यांनी खात्याचा पदभार स्वीकारला नव्हता. तसेच जानेवारीला झालेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशानाकडे त्यांनी पाठ फिरवली होती.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी गुरुवारी रात्री दिल्लीत धाव घेऊन कॉंग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ यांच्याशी चर्चा केली. कॉंग्रेसश्रेष्ठींनी वडेट्टीवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि शिवसेनेकडील मदत आणि पुनर्वसन खाते मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
वरिष्ठ नेत्यांच्या आश्वासनानंतर वडेट्टीवार यांची नाराजी दूर झाली. मदत आणि पुनर्वसन खाते शिवसेनेच्या संजय राठोड यांच्याकडे आहे. त्यामुळे कॉंग्रेसला मदत आणि पुनर्वसन खाते देताना शिवसेना आपल्याकडे भूकंप पुनर्वसन हे खाते घेण्याची शक्यता आहे.
मी नाराज नव्हतो! – वडेट्टीवार
आपण पक्षावर नाराज नव्हतो. आघाडी सरकारच्या खातेवाटपात कॉंग्रेसच्या वाट्याला जे खाते आले त्यामुळे मी नाराज होतो. सध्या शिवसेनेकडे असलेले मदत आणि पुनर्वसन खाते मिळणार असल्याने माझी नाराजी दूर झाली असून मी सोमवारपासून कामाला सुरूवात करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथे सांगितले.