करून सवरून नामानिराळे राहिल्याची नेटकऱ्यांची चीनच्या भूमिकेवर टीका
वुहान – चीनमधूनच जगभर करोनाचा प्रसार झाला तसेच त्यांच्याच चुकीची शिक्षा आज संपूर्ण मानवजातीला भोगावी लागत आहे, अशी टीका गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. त्याच चीनमधील ज्या वुहान शहरातून करोना पसरला तिथेच आता हा धोका संपल्याने फुटबॉल सरावाला सुरुवात झाली आहे. आता पुढील काळात स्पर्धांचेदेखील आयोजन केले जाईल. यावर संताप व्यक्त करत जगभरातील नेटकरी मंडळींनी सोशल मीडियावर चीनला करून सवरून नामानिराळे असे सुनावत टीका केली आहे.
करोनाचा पहिला रुग्ण याच शहरात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आढळल्याचे सांगितले जात असून त्याची जाहीर वाच्यता देखील केली गेली नाही. त्यानंतर हा धोका मार्च महिन्यात जगासमोर आला आणि क्रीडाक्षेत्रासह सर्वच घटकांना याचा फटका बसला. अनेक कार्यक्रम, स्पर्धा, सराव, बैठका, सोहळे एकतर रद्द करावे लागले किंवा लांबणीवर टाकावे लागले. यातून कामगार कपात झाली, वेतन कपात झाली. रोजंदारीवर काम करणारे तर रस्त्यावर आले. पण त्याची कोणतीही काळजी किंवा फिकीर चीनकडून दाखवली गेली नाही.
त्यांच्यावरील आजवरचे सर्व आरोप त्यांनी फेटाळलेच आहेत. अशा स्थितीत जे शहर करोनाचे जन्मस्थान होते तिथेच हा धोका पूर्णपणे संपुष्टात आला व बुधवारपासून शहरातील विविध मैदानांवर फुटबॉलपटूंनी सरावालाही सुरुवात केली. चीनच्या या धोरणावर आज जगभरात टिकेची झोड उठली आहे. तेथील केवळ फुटबॉलपटूच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनीही मैदानांवर उतरत गेल्या तीन महिन्यांचा वचपा काढत फुटबॉलचा आनंद लुटला.
सुपर लीगही सुरू होणार…..
जागतिक स्तरावरील अत्यंत प्रसिद्ध असलेली चायनीज सुपर लीग फुटबॉल स्पर्धादेखील आता जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याचे संकेत त्यांच्या फुटबॉल महासंघाने दिले आहेत. शहरात सराव सुरू झाल्यावर या लीगमधील संघ वुहान हॉल व वुहान स्टार्स या क्लबच्याही काही खेळाडूंनी मैदानावर उतरतच सराव केला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या आदेशाला हरताळही फासण्यात आला. यावर देखील अनेकांनी चीनवर समाजमाध्यमांतून टीका केली आहे.