Asian Games 2023 : आशी चौकसे, मानिनी कौशिक व सिफ्ट कौर समारा या भारताच्या तीन अव्वल नेमबाजांनी महिलांच्या 50 मीटर रायफल 3 सांघिक नेमबाजी स्पर्धेत रजतपदक मिळवले. भारताच्या या त्रिकुटाने 1754 गुण नोंदवले. अवघ्या 19 गुणांनी त्यांना सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. चीनने सुवर्णपदक मिळवले.
यापूर्वी पुरुष सांघिक गटात दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील, ऐश्वरी प्रताप सिंग तोमर यांच्या संघाने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल गटात सुवर्णपदक पटकावले होते.
तसेच महिलांच्या 10 मीटर एअर रायफल संघात मेहुली घोष, रमिता जिंदाल व आशी चौकसे यांनी रजतपदक मिळवले. रमिताने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत ब्रॉंझपदकही मिळवले आहे.
नेमबाज सिफ्ट कौरला वैयक्तिक सुवर्ण…
भारताच्या सिफ्ट कौर सामरा या अव्वल महिला नेमबाज खेळाडूने महिलांच्या 50 मीटर रायफल 3 प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदकाला गवसणी घातली. तसेच आशी चौकसी हिने या गटात ब्रॉंझपदक मिळवले. सामरा हिने 443 गुणांसह अव्वल स्थान मिळवले. चीनची क्युंगो झांग 441.9 गुणांसह दुसऱ्या स्थानी तर, भारताचीच आशी चौकसी 437.8 गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली.
त्यापूर्वी भारताची स्टार महिला नेमबाज मनू भाकरने ईशा सिंग आणि रिदम संगवान यांच्यासह सांघिक गटात खेळताना महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.