Asian Games 2023 Day Five : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून चार दिवसांत भारताने 22 पदके जिंकली आहेत. पाचव्या दिवशीही अनेक खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा आहे.
चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज (दि.28) 5वा दिवस आहे.भारतानं पाचव्या दिवशी आज वुशूमध्ये रजत पदक तर पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारतीय पुरूष संघाने सुवर्णपदक जिंकले.यासह भारताने आतापर्यंत 24 पदके जिंकली आहेत.
2018 च्या आशियाई खेळांमध्ये, भारतीय संघाने 570 सदस्यांच्या तुकडीतून 80 पदके मिळवून आशियाई खेळांमध्ये सर्वाधिक पदकांचा विक्रम प्रस्थापित केला होता. आता या चालू आवृत्तीत (Asian Games 2023) , भारतीय संघाला 100 हून अधिक पदकांचे लक्ष्य ठेवून मागील सर्वोत्तम कामगिरीचा टप्पा ओलांडण्याची आशा आहे.
भारतासाठी चालू 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खालील खेळाडूंनी आतापर्यंत
पदके जिंकली आहेत…
1. नेमबाजी, महिला 10 मीटर एअर रायफल संघ: मेहुली घोष, रमिता आणि आशी चौकसी यांच्या नेमबाजी संघाने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत दुसरे स्थान मिळवून रौप्य पदक जिंकले. त्याने एकूण 1886 गुण मिळवले.
2. रोइंग पुरुष दुहेरी स्कल्स : अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग या जोडीने लाइटवेट पुरुष दुहेरी स्कल्समध्ये रौप्य पदक जिंकले.
3. रोइंग, पुरुषांची जोडी: लेख राम आणि बाबू लाल यादव या जोडीने तिसरे स्थान पटकावले आणि कांस्यपदक जिंकले.
4. रोइंग, मेंस एट(rowing Men’s Eight event) : रोईंगमध्ये पदकांची घोडदौड सुरू ठेवत भारताने या वेळी रोइंग, मेंस एट या स्पर्धेत आणखी एक रौप्य पदक जिंकले.
5. नेमबाजी, महिला 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक: महिला सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या रमिता जिंदालने 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत 230.1 गुणांसह कांस्यपदक जिंकले.
6. नेमबाजी, पुरुष 10 मीटर एअर रायफल संघ: दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील आणि ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर या त्रिकुटाने 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. 1893.7 च्या स्कोअरसह, त्यांनी 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत संघाचा विद्यमान विश्वविक्रम मोडला.
7. रोइंग, पुरुष कॉक्सलेस फोर: जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनीत आणि आशिष कुमार यांच्या चौकडीने पुरुषांच्या कॉक्सलेस फोरमध्ये तिसरे स्थान पटकावले आणि कांस्यपदक जिंकले.
8. रोइंग, पुरुष क्वाड्रपल स्कल्स: रोईंगमध्ये भारताने कांस्यपदक जिंकले. सतनाम, परमिंदर, जाकर आणि सुखमीत या चौघांनी अंतिम फेरीत ३:६.०८ मिनिटांच्या वेळेसह तिसरे स्थान पटकावले.
9. पुरुषांची 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक: नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, ज्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतर दोघांसह भारताला सांघिक स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते, त्याने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.
10. पुरुष 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल संघ: आदर्श सिंग, अनिश भानवाला आणि विजयवीर सिद्धू या त्रिकुटाने एकूण 1718 गुणांसह भारतासाठी कांस्यपदक जिंकले.
11. महिला क्रिकेट: भारतीय संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव करून सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ पहिल्यांदाच सहभागी झाला होता. पहिल्याच प्रयत्नातच सुवर्णपदक जिंकण्यात टीम इंडियाला यश आले आहे.
12. नाविक नेहा ठाकूर: 17 वर्षीय भारतीय सेलर (नाविक) नेहा ठाकूरने रौप्य पदक जिंकले. तिने मुलींच्या डिंगी ILCA4 स्पर्धेत 11 शर्यतींमध्ये एकूण 27 गुण मिळवले.
13. नाविक इबाद अली: इबाद अलीने नौकानयनात कांस्यपदक जिंकले. त्याने पुरुषांच्या विंडसर्फर आरएस एक्स स्पर्धेत 52 च्या निव्वळ स्कोअरसह तिसरे स्थान पटकावले.
14.घोडेस्वार संघ: हृदय छेडा, दिव्याकृती सिंग, अनुष अग्रवाल आणि सुदीप्ती हजेला यांच्या भारतीय मिश्र संघाने घोडेस्वारीत 209.205 गुणांसह सुवर्णपदक जिंकले.
15. 50 मीटर थ्री पोझिशन रायफल टीम;(सिफ्ट, मानिनी आणि आशी): भारताने 50 मीटर थ्री पोझिशन सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. सिफ्ट कौर समरा, आशी चौकसे आणि मानिनी कौशिक यांच्या संघाने चीनच्या जिया सियू, हान जियायू आणि झांग क्विओंग्यु यांच्यानंतर दुसरे स्थान पटकावले.
16. 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धा : मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांनी 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यांनी चीनला तीन गुणांनी हरवले!
17. 50 मी थ्री पोझिशन रायफल वैयक्तिक, सिफ्ट कौर (गोल्ड): सिफ्ट कौर सामरा हिने 50 मीटर थ्री पोझिशन रायफल वैयक्तिक स्पर्धेत 10.2 गुण मिळवून सहज सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारतासाठी एकेरी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिफ्ट कौर ही पहिली ऍथलीट आहे. सुवर्णपदक जिंकण्यासोबतच सिफ्टने नवा विश्वविक्रमही केला आहे. तिनं 469.6 गुण मिळवले जे मागील विक्रमापेक्षा 2.6 ने अधिक आहेत.
18. 50 मीटर थ्री पोझिशन रायफल वैयक्तिक, आशी चौकसे (कांस्य): सिफ्टने 50 मीटर थ्री पोझिशन रायफल वैयक्तिक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, तर त्याच स्पर्धेत आशी चौकसेने कांस्यपदक जिंकले.
19. भारतीय पुरुष स्कीट नेमबाजी संघ (अंगद, गुर्जोत, अनंत): भारतीय पुरुष स्कीट नेमबाजी संघाने कांस्य पदक जिंकले. अंगद बाजवा, गुरज्योत सिंग खंगुरा आणि अनंत जीत सिंग नारुका या त्रिकुटाने एकूण 355 गुण मिळवले आणि अंतिम फेरीत तिसरे स्थान पटकावत कांस्यपदक प्राप्त केलं.
20. सेलिंग(नौकायन) डिंघी ILCA 7 पुरुष, विष्णू सरवणन (कांस्य): विष्णू सरवननने पुरुषांच्या डिंगी ILCA 7 मध्ये 34 निव्वळ स्कोअरसह कांस्यपदक जिंकले.
21. महिला 25 मीटर पिस्तूल, ईशा सिंग (रौप्य): ईशा सिंगने नेमबाजीत रौप्य पदक जिंकले आहे. तिने महिलांच्या 25 मीटर पिस्तुल स्पर्धेत 34 गुण मिळवले आणि दुसरेे पटकावले.
22. शॉटगन स्कीट, पुरुष, अनंत नाकुरा (रौप्य): अनंत नाकुराने पुरुषांच्या शॉटगन स्कीटमध्ये रौप्यपदक जिंकले. अनंतने 60 प्रयत्नांपैकी 58 अचूक शॉट्स लगावले.
23. वुशु, महिला, रोशिबिना देवी (रौप्य): रोशिबिना देवीने महिलांच्या 60 किलो वुशू स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे.
24. नेमाबाजी संघ, 10 मीटर एअर पिस्तूल (सुवर्ण): सरबज्योत सिंग, अर्जुन चीमा आणि शिव नरवाल यांच्या पुरुषांच्या संघाने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात चीनचा एका गुणाने पराभव करत भारतासाठी 1734 गुणांसह सुवर्णपदक जिंकले.