मुलतान :- यजमान पाकिस्तान व नवोदित नेपाळ यांच्यातील सलामीच्या लढतीद्वारे यंदाच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा यंदा एकदिवसीय सामन्यांच्या रचनेनूसार हायब्रीड पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. राजकीय तणावामुळे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाऊ शकणार नसल्याने भारताचे सर्व सामने श्रीलंकेतच होणार आहेत.
पाकिस्तान विरुद्ध नेपाळ
वेळ – दुपारी 3 वाजल्यापासून
ठिकाण – मुलतान
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस
यजमान पाकिस्तानने या स्पर्धेपूर्वी अफगाणिस्तानविरुद्धची मालिका निर्विवाद जिंकल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यांचे फलंदाज व गोलंदाज भरात असल्याने नेपाळविरुद्ध त्यांचेच पारडे जड राहणार आहे. बाबर आझम याच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत भारतासह संभाव्य विजेता मानला जात आहे. त्यांच्याकडे फलंदाजी, गोलंदाजीत दीग्गज खेळाडू आहेत.
त्या उलट नेपाळ संघाला या सामन्यातून केवळ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचा अनुभव मिळणार आहे. रोहित पौडेल हा अष्टपैलु त्यांच्या संघाचा कर्णधार असल्याने ते बलाढ्य पाकिस्तानला विजयासाठी कशी लढत देतात यावरच त्यांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील स्थान निश्चित होणार आहे. तसेच त्यांच्या संघाला पाकिस्तान, श्रीलंकेतील वातावरणात खेळण्याचा मोलाचा अनुभवही मिळणार आहे.
त्यांचा अनुभवी गोलंदाज संदीप लमिछनेयाची कामगिरी लक्षवेधी ठरणार आहे. त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असले व त्याला अटक झाली होती व नंतर जामीनही मिळला होता. त्याबाबतचा खटला अद्याप सुरु असल्याने त्याची संघातील निवड वादग्रस्त ठरली होती. मात्र, एकूणच हा सामना स्पर्धेचा सलामीचा सामना असल्याने पाकिस्तान वर्चस्व राखेल असेच चित्र सध्या दिसत आहे.
आझमच्या कामगिरीकडे लक्ष…
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्यात सरस कोण अशी चर्चा सातत्याने सुरु असताना यंदाच्या स्पर्धेत हे दोन्ही खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अझमची पहिली परिक्षा आज नेपाळविरुद्ध होणार असून ते शतक खेळी करत सर्वात कमी डावात 19 आंतरराष्ट्रीय शतके पूर्ण करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.