कोलंबो :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज (शुक्रवार) भारत व बांगलादेश यांच्यात सुपर फोर गटातील अखेरची साखळी लढत होत आहे. भारतासाठी या सामन्यातून कमावण्यासारखे काही नसून बांगलादेशसाठी सामना गमावण्यापेक्षा किमान प्रतिष्ठा राखणे हेच उद्दिष्ट राहणार आहे. आता या लढतीद्वारे भारतीय संघात काही प्रयोग केले जाणार का हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भारत विरुद्ध बांगलादेश
वेळ – दुपारी 3 वाजल्यापासून
ठिकाण – कोलंबो
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस
आज आशिया चषक 2023 चा शेवटचा सुपर फोर सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. 17 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्धच्या फायनलपूर्वी तयारी म्हणून टीम इंडिया हा सामना पाहणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक(TOSS) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या स्पर्धेत भारताने यापूर्वीच अंतिम फेरी गाठली असून सलग दोन पराभवांमुळे बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सुपर फोर गटात भारतीय संघाने पहिल्यांदा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला तर त्यानंतर झालेल्या लढतीत श्रीलंकेवर मात करत अंतिम फेरीत स्थान मिळवले.