बगदाद – इराकमध्ये सुरु असलेल्या आशिया करंडक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेत्रदीपक यश मिळवले आहे. या स्पर्धेत भारताच्या मुला-मुलींच्या संघाने सुवर्णपदक पटकावण्याचा विक्रम साकार केला आहे.
स्टेज-2 या गटात भारतीय संघातील मुलांनी तसेच मुलींनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मुलींच्या संघात महाराष्ट्रातील साताऱ्याच्या आदिती स्वामी हिचा समावेश आहे. या स्पर्धेतील कंपाऊंड प्रकारात भारतीय महिला तिरंदाजांनी अंतिम फेरीत कझाकिस्तानचा 204-201 असा पराभव केला व सुवर्णपदकाला गवसणी घातली.
मुलांच्या संघाने देखील वर्चस्व राखत बांगलादेशवर 224-218 अशी मात करत सुवर्णपदक जिंकले. या संघात महाराष्ट्राच्या प्रथमेश जावकर, प्रथमेश फुगे यांचा समावेश आहे.