ऍथलेटिक्समध्ये रिंकी पावरा व पूनम सोनुने यांना ब्रॉंझपद
गुवाहटी : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे तिसीया खेलो इंडिया युथ गेम्समध्ये जिम्नॅस्टिक्समध्ये आपला दबदबा कायम राखला. स्पर्धेत 17 वर्षांखालील गटात अस्मी बडदे हिने आणखी तीन सुवर्णपदकांची कमाई करीत आपले पदार्पण सार्थ ठरविले. श्रेया बंगाळे हिने आपल्या नावावर सुवर्णपदकांची नोंद करीत संघाच्या वर्चस्वाला हातभार लावला.
अस्मीने काल रिदमिक सर्वसाधारण प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. त्यामध्ये तिने शनिवारी चेंडू, दोरी व रिबन प्रकारातील सुवर्णपदकांची भर घातली. क्लब रॅंक प्रकारात तिला रौप्यपदक मिळाले. या प्रकारात श्रेया बंगाळे हिने तिला मागे टाकून सोनेरी कामगिरी केली. श्रेयाने दोरी प्रकारात रौप्यपदक तर चेंडू प्रकारात ब्रॉंझपदक पटकाविले.
अस्मी व श्रेया या दोन्ही खेळाडू ठाणे येथे पूजा व मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. अस्मी ही 14 वर्षीय खेळाडू ठाणे येथील ज्ञानसाधना विद्यामंदिर प्रशालेत शिकत आहे. रिबन प्रकारात महाराष्ट्राच्या मैत्रेयी शेलूकरने रौप्यपदकाची कमाई केली.
मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या ओंकार धनावडे व आर्यन नहाते यांनी समांतर बार प्रकारात अनुक्रमे रौप्य व ब्रॉंझपदक मिळविले. या प्रकारात उत्तर प्रदेशच्या जतीन कनोजियाने सुवर्णपदक पटकाविले. आपल्याकडे असलेल्या नैसर्गिक गुणवत्तेच्या आधारे पदकांच्या यादीत शेतकरी कुटुंबातील मुल-मुलींना स्थान मिळविता येते, याचा प्रत्यय महाराष्ट्राच्या रिंकी पावरा व पूनम सोनुने यांनी “खेलो इंडिया युथ गेम्स’च्या तिसऱ्या पर्वात मैदानी स्पर्धेत दाखवून दिला.
नंदूरबार जिल्ह्यातील खर्डी या आदिवासी गावात छोटीशी शेती असलेले धन्या पावरा यांची कन्या रिंकी हिने येथील 17 वर्षांखालील मुलींच्या गटात तीन हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत ब्रॉंझपदक पटकाविले. या स्पर्धेत ती प्रथमच सहभागी झाली आहे. या शर्यतीत तिने सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. मात्र, शेवटच्या 300 मीटर्समध्ये पायातील वेदनांमुळे तिने आघाडी गमावली.
झारखंडची सुप्रिती कश्यप (10 मिनिटे 2 सेकंद) व गुजरातची दृष्टीबेन प्रवीणभाई (10 मिनिटे 4.76 सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. रिंकीने 10 मिनिटे 5.33 सेकंदात ही शर्यत पार केली.
रिंकीने वर्ष 2018 मध्ये मॅरेथॉन शर्यतीत भाग घेतला होता.
तेथे तिने केलेली कौतुकास्पद कामगिरी पाहून नाशिक येथील ख्यातनाम प्रशिक्षक विजेंदरसिंग यांनी तिला आपल्या अकादमीत प्रशिक्षणाची संधी दिली. गतवर्षी तिची सिंगापूरमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झाली होती. मात्र, तिला वेळेवर पासपोर्ट मिळाला नव्हता. रिंकीने पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत तीन हजार मीटर्स शर्यतीत रौप्यपदक पटकाविले होते.
दरम्यान, तिरंदाजीचा सराव करत असताना एका 14 वर्षीय खेळाडूच्या मानेत बाण घुसला. डॉक्टरांनी चार तासांच्या ऑपरेशननंतर युवा तिरंदाजचा जीव वाचवला. शिवगिनी गोहेम असे तिचे नाव आहे.विजेंदर यांचीच शिष्या पूनमने गतवर्षी पुण्यातील “खेलो इंडिया’ स्पर्धेत पाच हजार मीटर्सची शर्यत जिंकली होती. यंदा येथे तिला विजेतेपद टिकविता आले नाही.
मंगलोर येथे नुकत्याच झालेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेत तिने 10 हजार मीटर्समध्ये सुवर्णपदक मिळविले होते. या स्पर्धेनंतर ती तापाने आजारी पडली. तरीही तिने येथे भाग घेतला. तिला येथे 5 हजार मीटर्सचे अंतर पार करण्यास 17 मिनिटे 21.6 सेकंद वेळ लागला.
हरियाणाची अंकिता (16 मिनिटे 28.75 सेकंद) व गुजरातची रिना पटेल (16 मिनिटे 46.20 सेकंद) यांना अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळाले. पूनम ही मूळची बुलढाणा येथील असून तिचे वडील शेती करतात. ती सध्या नाशिकच्या भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष कला शाखेत शिकत आहे. तिने गतवर्षी पुण्यातील “खेलो इंडिया’ स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक मिळविले होते.
महाराष्ट्र शासनाचा “गो गर्ल गो’ उपक्रम
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये महिला खेळाडूंनी केलेली उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या क्रीडा व युवा सेवा संचालनालयाने महाराष्ट्रातील मुलींना बळकटी देत सबलीकरणासाठी ‘गो गर्ल गो’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याद्वारे खेळामध्ये मुलींचा सहभाग वाढवून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविण्याची मोठी शक्यता आहे. आसाम, गुवाहाटी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा
स्पर्धेतही हा उपक्रम राबविण्यात आला. राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर क्रीडा, तंदुरुस्ती व पोषण या क्षेत्रात हा उपक्रम राबविला जाणार आहे. राज्यातील एक लाख शाळांमधील 11 दशलक्षाहूनही अधिक विद्यार्थिनी या मोहिमेचा एक भाग होणार आहेत. मुलींची शारीरिक तंदुरुस्ती सुधारणे, खेळात त्यांचा सहभाग वाढविणे आणि त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये स्थान मिळविणे, हे या अभियानाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.