काठापूर-भोकारवाडी येथे ओझर-रांजणगाव रस्त्याच्या कामाला गती
लाखणगाव- अष्टविनायक रस्ता म्हणजेच ओझर ते रांजणगाव या रस्त्याचे काम आणि पुलाचे बांधकाम काही प्रमाणात सुरू झाले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने रस्त्यांच्या कामाला काही प्रमाणात सवलत दिल्याने अनेक रस्त्यांची कामे सुरू झाली आहे.
सध्या राज्यासह देशभरात करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे; परंतु काही उद्योग आणि व्यवसायांना नियम आणि अटी घालुन काम करण्यास सवलत दिली आहे. यामध्ये रस्त्याच्या कामांनाही सवलत मिळाली आहे.त्यामुळे सध्या अनेक रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातून जाणारा ओझर-रांजणगाव रस्त्याचे काम पारगाव, भोंकरवाडी-काठापूर, पोदेंवाडी-रोडेवाडी आदी काही ठिकाणी सुरू झाले आहे. दरम्यान, करोनामुळे काम रखडल्याने अनेक कामगार बसून होते, त्यामुळे आपल्या हातून काम काढून घेतल्याने आता आपल्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याची त्यांच्या मनात भावना निर्माण झाली होती. मात्र, राज्य आणि केंद्र सरकारने रस्त्याच्या कामांना काही अटीवर परवानगी दिल्याने राज्यभरातील रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत.
पावसाळा तोंडावर आल्याने रस्त्यांची कामे पुन्हा चार महिन्यासाठी ठप्प होणार आहेत. त्यामुळे पुढील दीड महिन्याच्या कालखंडातच जेवढी रस्त्यांची कामे पूर्ण होतील.ती पूर्ण करण्याकडे कल आहे, त्यानंतर पावसाळ्यात कामे ठप्प होणार आहेत. सध्या उपस्थित कामगारांच्या माध्यमातून रस्त्याची कामे सुरू असून काही ठिकाणी मजुरांअभावी रस्त्याची काम संथ गतीने सुरू आहेत.