‘क्वारंटाइन’मधून वाधवान बंधू सीबीआयच्या कस्टडीत

सातारा (प्रतिनिधी) : येस बँक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय व ईडीच्या रडारावर असणार्‍या कपिल व धीरज वाधवान या बंधूंना आज रविवारी सीबीआयने महाबळेश्‍वर येथून अटक केली आहे. सातारा पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांना मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे.

डीएचएफएल या कंपनीचे सर्वेसर्वा कपिल व धीरज वाधवान यांच्यांवर पीएमसी व येस बँकेत अब्जावधी रुपयांच्या गैरव्यवहार केल्याचा ठपका आहे. याप्रकरणी काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे वाधवान बंधू सीबीआय व ईडीच्या रडारावर होते. गुन्हे दाखल झाल्यापासून सीबीआयचा ससेमिरा चुकविण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर होण्याअगोदर लोणावळा- खंडाळ्यातील एका खासगी बंगल्यावर वाधवान बंधू कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यानंतर वाधवान बंधूनी त्यांचा मुक्काम महाबळेश्वरला हलवला होता. मात्र, या प्रवासासाठी थेट गृह सचिवांचे पत्र घेतल्याचे समोर आल्यानंतर देशभरात गोंधळ उडाला होता.

त्यानंतर महाबळेश्वर पोलिसांनी वाधवान कुटुंबांला पाचगणी येथे क्वारंटाइन करून त्यांच्यावर जिल्ह्यात विनापरवानगी आल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. क्वारंटाइन संपल्यानंतर त्यांना त्यांच्या खासगी बंगल्यात ठेवण्यात आले होते.

त्यानंतर रविवारी सीबीआयने तत्काळ याबाबत कठोर पावले उचलून वाधवान बंधूंच्या अटकेसाठी महाबळेश्‍वर गाठले. वाधवान बंधूंना अटक करुन सीबीआयचे पथक मुंबईला रवाना झाले असून सोमवारी त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात उभे करणार असल्याची माहिती सीबीआयच्या अधिकार्‍यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.