बारामती – पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हाधीकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळं बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. यानुसार चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधीपत्याखाली असणारे अष्टविनायक तीर्थक्षेत्र मयुरेश्वर मंदिर मोरगाव व चिंतामणी मंदिर थेऊर आजपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहीती विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.
कोरोना या विषाणूजन्य आजाराची वाढती संख्या लक्षात घेता काल दि . २ रोजी पुणे जिल्हाधीकारी यांनी जिल्ह्यातील सर्व धार्मिकस्थळ बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. या अनुषंगाने चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव, विश्वस्त विश्राम देव, विनोद पवार, आनंद तांबे , राजेंद्र उमाप यांनी आजपासून चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधीपत्याखालील मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आज शनिवार दि ३ पासून देवस्थानच्या अधीपत्याखाली असणारे अष्टविनायक तीर्थक्षेत्र मयुरेश्वर मंदिर, चिंतामणी मंदिर थेऊर, मोरया गोसावी समाधी स्थळ व मंगलमुर्तीवाडा चिंचवड पुढील सात दिवस किंवा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.