नवी दिल्ली – कॉंग्रेसचे माजी खासदार अशोक तंवर यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. या आधी तंवर यांनी कॉंग्रेस मधून नोव्हेंबर 2021 मध्ये तृणमुल कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला होता.
त्या नंतर त्यांनी स्वत:चा अपना भारत मोर्चा नावाचा पक्ष स्थापन केला होता. ते भारतीय राष्ट्रीय युवक कॉंग्रेस चे प्रभारी असताना कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे एकेकाळचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात होते. काही काळ त्यांनी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.
2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत तंवर यांनी दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाला पाठिंबा दिला होता आणि कॉंग्रेसविरोधात प्रचार केला होता. कॉंग्रेसमध्ये असताना तंवर यांनी हरियाणा प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव अशी महत्त्वाची पदे भूषवली.ते नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया चे माजी अध्यक्ष देखील होते.