नवी दिल्ली – कॉंग्रेसला रामराम ठोकणारे हरियाणाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांनी गुरूवारी नवा राजकीय पक्ष स्थापन केला. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे एकेकाळचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखले जाते.
माजी खासदार तंवर यांनी देशाची राजधानी दिल्लीतील कार्यक्रमात अपना भारत मोर्चा या पक्षाची घोषणा केली. त्यामुळे हरियाणात भाजप आणि कॉंग्रेस यांच्या नेतृत्वाखालील आघाड्यांना आव्हान देणारी तिसरी आघाडी उभी राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्या राज्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा यांचे तंवर पक्षांतर्गत कट्टर विरोधक मानले जात.
हुडा यांच्याबरोबरचे मतभेद विकोपाला गेल्यानेच त्यांनी कॉंग्रेसविरोधात बंड पुकारल्याचे मानले जाते. हरियाणात ऑक्टोबर 2019 मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीच्या काही दिवस आधी तिकीट वाटपाची प्रक्रिया गैरप्रकारांनी भरलेली असल्याचा आरोप करत तंवर कॉंग्रेसमधून बाहेर पडले.
त्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीविषयी उत्सुकता होती. आता स्वतंत्र चूल मांडून ते नव्या राजकीय खेळीसाठी सज्ज झाले आहेत.