हेडिंग्ले :- ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या ऍशेस कसोटी मालिकेमध्ये तिसऱ्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियावर तीन विकेट्सनी विजय मिळवत यजमान इंग्लंडने आपले आव्हान कायम राखले आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत.
विजयासाठी 251 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडसाठी हे आव्हान अवघड नव्हते. मात्र, सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसाने वाहून गेल्यानंतर चौथ्या दिवशी सामना जिंकणे आवश्यक बनले होते.
इंग्लंडच्या या विजयात हॅरी ब्रुकचे मोठे योगदान राहिले. त्याने 90 चेंडूंचा सामना करताना 9 चौकारांसह 75 धावा केल्या. शिवाय सलामीवीर जॅक क्रॉलीच्या 44 आणि ख्रिस वोक्सच्या नाबाद 32 धावाही मोलाच्या ठरल्या. विक्स आणि ब्रुक्समधली सहाव्या विकेटसाठीची 59 धावांची भागीदारी निर्णायक ठरली.
पाहुण्या ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलेच सतावले. स्टार्कने 78 धावांत पाच मोहरे टिपताना इंग्लंडच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते. पॅट कमिन्स आणि मिशेल मार्श यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
या मालिकेतील चौथी कसोटी 19 जुलैपासून मॅंचेस्टर येथे सुरू होणार आहे, तर पाचवी कसोटी 27 जुलैपासून ओव्हलवर होईल.