लोणावळा, दि. 29 – लोणावळा शहर भाजपाच्या वतीने रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ व चालढकल कारभाराच्या विरोधात घेण्यात आलेल्या भांगरवाडी येथील भाजपच्या स्वाक्षरी मोहिमेला लोणावळा व परिसरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ही मोहीम सुरू होताच, अर्धा -पाऊण तास बंद राहणारे भांगरवाडी येथील रेल्वे फाटक ताताडीने उघडले जाऊ लागले आहे. त्यामुळे याठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त करत आश्चर्यदेखील व्यक्त केले आहे.
रेल्वे मार्गावर लोणावळा- भांगरवाडी येथे असलेले रेल्वे फाटक अर्धा ते पाऊण तास उघडत नसल्याने नागरिक हैराण होत होते. किमान चार ते पाच गाड्या गेल्याशिवाय फाटक उघडले जात नव्हते. यामुळे दुतर्फा अर्धा किमीपेक्षा जास्त अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागत होत्या. तर या गर्दीत वाहनांचे किरकोळ अपघात व वाद ही नित्याची बाब बनली होती. मात्र सिंग्नल यंत्रणा स्वयंचलित असल्याचे कारण देत गेट सतत बंद ठेवले जात होते. आज मात्र रेल्वे गाडी पास झाल्यानंतर तात्काळ फाटक उघडले जात असल्याचे पाहून कालपर्यत रेल्वे प्रशासन हे जनतेची फसवणूक व दिशाभूल करत होते का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
नागरिकांच्या मागण्या –
लोणावळा शहरातील वाहतूककोंडीवर प्रभावी पर्याय ठरणाऱ्या भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम मागील काही महिन्यांपासून रखडले आहे. ते काम त्वरित मार्गी लागावे.
– लोणावळा रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना पुर्वीसारखा थांबा चालू करण्यात यावा.
-स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वे परिसरात वेळोवेळी स्वच्छता अभियान राबवावे.
– पुणे लोणावळा लोकलच्या सर्व सेवा पुर्ववत कराव्यात तसेच दुपारच्या सत्रात लोकल च्या फेऱ्या वाढवाव्यात.
सिने अभिनेते भरत जाधव यांचा देखील सहभाग
भांगरवाडी रेल्वे गेट येथे दुतर्फा ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सिनेअभिनेते भरत जाधव यांनीदेखील सहभाग नोंदवत, स्वाक्षरी केली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेवक व भाजपा गटनेते देविदास कडू, माजी सभापती प्रदिप थत्ते, हर्षल होगले, अरुण लाड, शुभम मानकामे, अर्जुन पाठारे, दीपक कांबळे, सुरेश गायकवाड, अभय पारख, रुपेश नांदवटे, नंदू जोशी, परिजा भिल्लारे, विजया मराठे, श्रिया रहाळकर, आदिती होगले, सुप्रिया देशपांडे, बाबु संपत, योगेश मोदी यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.