मुंबई – शिवसेनेत फूट पाडल्यानंतर ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. आता शिवसेनेतील आणखी एक माजी आमदार शिंदे गटात सामील झाला आहे.
माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून त्यांच्यासोबत असंख्य समर्थकांनीही शिंदे गटाला जवळ केले आहे. हेगडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाला समर्थन दिले.
माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी आपल्या समर्थकांसह आज #बाळासाहेबांची_शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी पक्षात त्यांचे स्वागत करून त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. #BalasahebanchiShivsena pic.twitter.com/D3E3AC37Z4
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 28, 2022
दरम्यान, शिंदे गटात प्रवेश करताच कृष्णा हेगडे यांना शिंदे गटात उपनेतेपद आणि प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबईतील विलेपार्ले भागात कृष्णा हेगडे यांचा बालेकिल्ला आहे. कॉंग्रेस, भाजपा, शिवेसना अशा पक्षात काम करून ते आता शिंदे गटात सामील झाले आहेत.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना कृष्णा हेगडे यांचा शिंदे गटातील पक्षप्रवेश ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.