वडमुखवाडीत थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टच्या वतीने स्वागत
आळंदी: श्रीक्षेत्र पंढरपूर येथून श्री पांडुरंगाच्या पादुका पालखी सोहळा माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी गुरुवारी (दि. 17) सायंकाळी हरिनामाच्या गजरात आलंकापुरीत दाखल झाला त्यावेळी विठु नामाचा एकच गजर करण्यात आला. या वेळी पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
दरम्यान, श्रीक्षेत्र पंढरपूर येथील पांडुरंगरायांच्या पालखी सोहळ्याचे वडमुखवाडीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टच्या वतीने सयाजीनाथ विद्यालयात रांगोळीच्या पायघड्या, पुष्पसजावटीसह हरिनाम गजरात सोहळ्याचे आळंदीकडे मार्गस्थ होताना विसाव्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ऍड. विष्णू तापकीर यांनी पालखी सोहळ्याचे परंपरेने स्वागत केले.
याप्रसंगी श्री पांडुरंगराय पालखी सोहळा प्रमुख नामदेव महाराज वासकर, विठ्ठल महाराज वासकर, प्रभू महाराज वासकर, संदीप कुलकर्णी पुजारी, माजी आमदार रामभाऊ मोझे यांचा सत्कार संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ऍड. विष्णू तापकीर यांचे हस्ते शाल, श्रीफळ, उपरणे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्रींचे पादुकांची पूजा ऍड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर यांच्या हस्ते झाली. सपत्नीक दर्शन घेऊन श्रींचे पादुका पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी पांडुरंग महाराज बुरांडे, नंदकुमार वडगावकर, विलास वाघमारे, विश्वभर पाटील उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांना शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ, उपरणे देवून ऍड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रथा परंपरांचे पालन करीत गेल्या 10 वर्षांपासून श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरे समितीच्या वतीने पंढरपूर आळंदी पांडुरंगरायांच्या पादुका पालखी सोहळ्यातून आळंदी कार्तिकी एकादशी सोहळ्या अंतर्गत माऊलींच्या भेटीला येतात. पंढरपूर ते आळंदी पायी वारी पादुका पालखी सोहळा हरिनाम गजरात प्रवास करीत आळंदीत विसावला. यानिमित्त अनेक भाविक, वारकरी, दिंडेकरी, टाळकरी, विणेकरी पालखी मुक्कामी येथे विसवले. यावेळी परिसरातील नागरिक, भाविक यांनी पादुकांचे दर्शन घेतले. आळंदीत देखील श्रींचे पांडुरंगरायांच्या पालखी सोहळ्यातील वैभवी पादुकांची पूजा करून पादुकांना पुष्पहार, तुळशीहार, श्रीफळ अर्पण करण्यात आले. श्रींची आरती हरिनाम गजरात झाली. श्रींना महानेवैद्य झाला.