पुणे : तब्बल 42 कोटींची निविदा काढून महापालिकेने शहरभर खासगी संस्थेच्या माध्यमातून 1580 सुरक्षा रक्षक नेमले. पण, त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेळेवर वेतन मिळत नसल्याचे समोर आले आहे. क्रिस्टल प्रा. लि. कंपनीकडून वेतन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.तर, दुसऱ्या बाजूला महापालिका प्रशासन केवळ कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठकांवर बैठक घेत असून कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या प्रकारामुळे एका कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.
महापालिकेच्या सुमारे 600 मिळकतींच्या ठिकाणी सुरक्षारक्षक पुरविण्यासाठी अनेक नाट्यमय घडामोडी व वादाविवादानंतर मे. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला 42 तब्बल कोटी रुपयांचे काम देण्यात आले. या करारानुसार प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत कंपनीकडून सुरक्षा रक्षकांना पगार देणे बंधनकारक आहे. पण, कराराचे उल्लंघन होत असून कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याचे चित्र आहे. याबाबत कामगार संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर संबंधित कंपनीने एप्रिल व मेचा पगार थकविल्याने त्यांच्यावर कारवाईची नोटीस प्रशासनाने बजावली होती.
पण, त्यानंतर 25 जूनपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे पगार दिले जातील, असे कंपनीकडून आश्वासन दिले होते. आता एप्रिलचा पगार दिला असला, तरी मे महिन्याचा पगार अद्याप दिलेला नाही. याबाबत बुधवारी कंपनीच्या अधिकाऱ्यांची आयुक्तांकडे बैठक झाली असली, तरी त्याचा तपशील देण्याबाबत सुरक्षा विभागाचे अधिकारी मात्र टाळाटाळ करत आहेत. या प्रकरणी क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि.च्या पश्चिम विभागाचे प्रमुख रविराज लायगुडे यांच्याशी तीन वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
अधिकाऱ्यांकडून लपवाछपवी
कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी येत असल्यातरी संबंधित कंपनीला वाचविण्यासाठी सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची लपवाछपवी केली जात आहे. कंपनीवर कारवाई करावी, असे आयुक्तांचे आदेश आहेत. मात्र, कंपनीवर कारवाई झाल्यास ती ब्लॅक लिस्ट होईल. तसेच निविदा संपण्यास दोनच महिने शिल्लक आहेत. त्यामुळे कंपनीला वाचविण्यासाठी सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांचा आटापिटा सुरू असल्याची चर्चा असून काही अधिकारी कारवाईस टाळाटाळ करत असल्याचे सुरक्षा रक्षकांचा आरोप आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांपेक्षा ठेकेदारांचीच काळजी असल्याचा आरोपही केला जात आहे.