पुणे – सरकारी नोकरीचा गैरफायदा घेत “आओ जाओ घर तुम्हारा..’ असा समज करत महापालिकेत दररोज उशिरा कामावर येणाऱ्या आणि कामाची वेळ संपण्याआधीच कार्यालय सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता जरब बसणार आहे. महापालिकेसह शिक्षण मंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतनपत्रक आता सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाइन तयार होणार असून कर्मचाऱ्यांच्या कामावर येण्याच्या आणि जाण्याच्या वेळा या प्रणालीत रिअल टाईम नोंदविल्या जाणार आहेत.
त्यामुळे, कामाचे तास न भरल्यास कामगारांच्या वेतन कपात केले जाणार असून महिन्याभरात कर्मचारी किती दिवस उशिरा आला आणि किती दिवस लवकर गेला याच्या नोंदही असणार आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात या प्रणालीची चाचणी घेण्यात येणार असून डिसेंबरपासून त्यांची अंमलबजावणी होईल.
लेट लतीफ अडचणीत येणार
राज्य शासनाच्या धर्तीवर महापालिकेतही कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा आहे. त्यानुसार, कर्मचाऱ्यांची कामाची वेळ सकाळी पाऊने दहा ते सायंकाळी सव्वा सहापर्यंत आहे. मात्र, अनेक कर्मचारी सकाळी साडे दहानंतरच कार्यालयात येतात. तर संध्याकाळी साडेपाच वाजताच निघण्याची तयारी असते. त्यामुळे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती दररोज एका क्लीकवर उपलब्ध होणार असून लेट लतीफ कर्मचारी चांगलेच अडचणीत येणार आहेत.
सध्या महापालिका कर्मचाऱ्यांची हजेरी थंब मशिनवर घेत असली तरी कार्यालयात पुन्हा उपस्थितीचे रजिस्टर ठेवलेले या रजिस्टरवरूनच वेतन काढले जाते. त्यामुळे कर्मचारी उशिरा येतात. मात्र, या प्रणालीत याला जरब बसणार आहे.