पुणे – महापालिका अग्निशमन दलाच्या ताब्यात आता नवीन कृत्रिम श्वसन वाहन दाखल होणार आहे. मोठ्या आगीच्या घटनांमध्ये लक्षणीय प्रमाणात धुराचे लोट असल्यास तेथे अग्निशमन दल कर्मचाऱ्यांना अविरतपणे कृत्रिम श्वसनाची सुविधा या वाहनातील यंत्रणेतून मिळणार आहे.
मुंबई महापालिकेकडे असे वाहन असून सुमारे 1 कोटी 42 लाखांच्या या वाहन खरेदीस मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. आगीच्या घटनेच्या ठिकाणी धुराचे प्रमाण मोठे असल्यास अग्निशमन दलाचे कर्मचारी ऑक्सिजन (शुद्ध हवेचे सिलिंडर) पाठीवर घेऊन बचावकार्य करतात.
मात्र, या सिलिंडरमधील हवा केवळ 20 ते 25 मिनिटेच पुरते. त्यातच घटनास्थळी कर्मचाऱ्याने धावपळ केल्यास ही हवा दहा ते पंधरा मिनिटच पुरते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पुन्हा बाहेर येऊन नवीन सिलिंडर घेऊन जावे लागते. परिणामी, आग नियंत्रण कार्यात सातत्य राहत नाही. तसेच कर्मचाऱ्यांच्या जिवास धोकाही निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन ही कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेली गाडी खरेदी करण्यात येणार आहे. या गाडीत सुमारे 30 सिलिंडर असतील. त्यातील 10 सिलिंडर कोणत्याही क्षणी वापरण्यासाठी तयार असतील.
तर या सिलिंडरला जोडणारी स्वतंत्र वाहिनीही असणार असून सिलिंडर सोबत न घेता या वाहिनीला मास्क जोडून कर्मचाऱ्यांना अवितरतपणे शुद्ध हवेचा पुरवठा करणे शक्य होणार आहे. तर या वाहनातच स्वतंत्र कॉम्प्रेसर यंत्रणा असून जसे सिलिंडर रिकामे होतीत, ते या कॉम्प्रेसरमधून तातडीने भरता येणार आहेत. एखादा सिलिंडर रिकामा होताना त्याचा अलर्टही दहा मिनिटे देण्याची सुविधा आहे, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिली.