पुणे – लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाने (एएफएमसी) नंदूरबार येथे राबवलेल्या वैद्यकीय तपासणी कार्यक्रमाद्वारे तेथील दुर्गम भागातील व्यक्तींना त्याचा सकारात्मक उपयोग झाला. अशा पद्धतीने दुर्गम भागात देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या वैद्यकीय चाचण्या आणि अहवाल आता काही मिनिटांत मिळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा वापर ‘एएफएमसी’ कडून केला जाणार आहे.
याबाबत लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल दलजीत सिंह यांनी शुक्रवारी माहिती दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘प्रज्ञा’ या संगणकीय वैद्यकीय उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांप्रमाणेच सैनिकांचेही आरोग्य चांगले राखणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी पुण्यातील एएफएमसीमध्ये प्रज्ञा या संगणकीय उपचार केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.
आपल्या देशातील दुर्गम भागामध्ये वैद्यकीय चाचण्या करणे कठीण आहे. त्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता वापर करून त्या सैनिकांच्या सर्व प्रकारच्या चाचण्या पुण्यातील या संगणकीय केंद्रातून करता येणार आहेत. एक्स-रे, एमआरआय, रक्ताच्या विविध चाचण्यांचे अहवाल इथून करून पाठवता येतील. जेणेकरून आजारी सैनिकाच्या आजाराचे निदान गतीने करता येईल, अशी माहिती सिंह यांनी दिली.
…कोणत्याही विषाणूची भीती नाही
करोना काळात ‘एएफएमसी’ने सैनिकांसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली. आता जिनोम सिक्वेन्सिंग वेगाने होत असल्याने कोणत्याही विषाणूची भीती नाही, असेही त्यांनी सांगितले. ‘एएफएमसी’मध्ये महिला छात्रांची संख्या सध्या योग्य प्रमाणात आहे. मात्र, भविष्यात गरज भासली तर ही संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही दलजीत सिंह यांनी नमूद केले.