पिंपरी -पिंपरी चिंचवड शहरामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शका सुचनानुसार रविवारी (दि. 27) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 1029 केंद्र असणार आहे. याठिकाणी पाच वर्षाखालील लहान मुलांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे.
पोलिस लसीकऱणसाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने आठ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी व 60 वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली 220 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे विविध स्वयंसेवक, मनपा क्षेत्रातील विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, एमपीडब्लू, एएनएम,बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका, क्रिडा शिक्षक, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा व इतर स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
महापालिकेने एकूण 1029 लसीकरण केंद्रांची स्थापना केली आहे. त्यापैकी सर्व मनपा दवाखाने, रुग्णालये, मोठी खाजगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी, अशा 916 ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे असणार आहे. तर बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी 37 ट्रान्झिट लसीकरण केंद्रे असतील. वीटभट्टया, बांधकामे, फिरत्या लोकांची पाले या ठिकाणच्या मुलांसाठी 76 फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली आहे. मोहिमेचा प्रचार स्लीप वाटप, बॅनर्स, स्टीकर्स, वॉल पेंटींग आदी माध्यमाद्वारे सुरू करण्यात आला आहे.
वैद्यकीय विभागाचा कॉपी पेस्ट कारभार
पल्स पोलिओ लसीकरणासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली. यासाठी विभागाने कॉपी पेस्ट कारभार केला असल्याचे समोर आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील असताना त्याठिकाणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर कर्मचाऱ्यांचा आकडा धडकी भरवणारा टाकला आहे. तब्बल 3 कोटी 12 लाख 21 हजार 29 कर्मचारी लसीकरणासाठी नेमले असल्याचा दावा केला आहे. ही चूक उशिरा लक्षात आल्यानंतर वैद्यकीय विभागाने पुन्हा प्रसिद्धीपत्रक पाठवत आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला.