पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात उपसूचनाद्वारे 885 कोटी 66 लाख रुपयांची वाढ-घट करण्यात आली आहे. यासह चालू वर्षाच्या 2021-22 च्या सुधारित अंदाजपत्रकातही फेरबदल करत स्थायी समितीने बुधवारी (दि.23) अंदाजपत्रक मंजूर केले. हे अंदाजपत्रक मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविले आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थांनी सभापती ऍड. नितीन लांडगे होते. सभेत अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे, सदस्य नीता पाडाळे, अभिषेक बारणे, शत्रुघ्न काटे, सुरेखा बुर्डे, मीनल यादव यांनी अंदाजपत्रक सर्वसमावेशक असल्याचे सांगत आयुक्तांचे कौतुक केले. तसेच प्रभागातील कामांना निधी देऊन विकासकामे केल्याने आयुक्तांचे आभार मानले. तर सदस्य सुजाता पाडाळे, अंबरनाथ कांबळे यांनी प्रभागासाठी दिलेला निधी पुरेसा नसून तो कमी असल्याची खंत व्यक्त केली.
या अंदाजपत्रकात वाढ-घटीच्या उपसुचनांद्वारे पुढीलप्रमाणे शिफारस करण्यात आली आहे. सन 2021-22 च्या सुधारित अंदाजपत्रकात 247 कामांसाठी 106 कोटी 29 लाखांहून जास्त शिफारस आणि सन 2022-23 च्या अंदाजपत्रकात 275 विकास कामांसाठी 885 कोटी 66 लाख रुपयांहून जास्त शिफारस करण्यात आली आहे. नवीन 67 विकास कामांसाठी 66 कोटी, 87 लाख रुपयांहून जास्त शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात आवश्यक त्या कामांसाठी दरवर्षी प्रत्येकी 25 लाख रुपयांची तरतूद करावी, अशीही शिफारस करण्यात आली आहे.
आयुक्तांनी निधी पळविला : अंबरनाथ कांबळे
नवी सांगवी, पिंपळे गुरव, कवडेनगर प्रभाग क्रमांक 31 मधील विकासकामे करण्यासाठी निधी नव्हता. तो देण्याबाबत आयुक्तांकडे दोन वर्षे पाठपुरावा केला. निधी नसल्याने कामे होत नसल्याचे सांगत आयुक्तांनी हात झटकले. अखेर सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन निधी वर्गीकरण करून घेतला. त्यानंतरही अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आली नाही. महापालिका 13 मार्चला बरखास्त झाल्यानंतर ते पाहिजे तसा निधी वर्ग करून कामांचे श्रेय घेतील, असा आरोप स्थायी समितीचे सदस्य अंबरनाथ कांबळे यांनी करत अंदाजपत्रकावर टीका केली.
मुख्य शिफारसी
महापालिकेसाठी ई-वाहन खरेदी, पद्मभूषण माजी खासदार राहुल बजाज स्मारक, स्त्री आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह, भोसरीतील सहल केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय, भोसरीत एसटीपी प्रकल्प, भोसरीतील नवीन रुग्णालयात 24 तास रुग्णसेवा, पुणे-मुंबई महामार्गावर वल्लभनगर येथे सुसज्ज पत्रकार भवन उभारावे, अशा विविध शिफारसी स्थायी समितीने केल्या आहेत.