पुणे: मास्क न घालता नाना पेठ परिसरात दुचाकीवरून फिरणाऱ्यास लष्कर पोलिसानी ताब्यात घेतले. त्याला सोमवारी लष्कर न्यायालयात हजर केले असता १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
महेश शांताराम धुमाळ (वय ३१, रा. ३२७, नाना पेठ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पोलीस हवालदार गणपतराव थिकोळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्याविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोरोना विषाणूचा प्रदूर्भाव वाढू नये यासाठी शहरात संचारबंदी तसेच जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे. तसेच मध्यवर्ती पेठांचा भाग सील करण्यात आला असून कर्फ्यु लावण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे शहरात मास्क लावल्याशिवाय नागरिकांना रस्त्यावर फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. भवानी पेठ परिसर तसेच कसबा पेठ या भागात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामध्ये महेश धुमाळ हा शनिवारी सायंकाळी नाका तोंडाला मास्क न लावता दुचाकीवरून फिरत होता. तो नाना पेठेतील इंदिरा गांधी चौक भागात आला असताना लष्कर पोलिसानी त्याला ताब्यात घेतले. चौकशी मध्ये तो विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी त्याच्याविरोधात राष्ट्रिय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
लष्कर पोलिसानी २ दिवसात दोषारोपपत्र तयार करून सोमवारी प्रथम न्यायदंडाधिकारी,लष्कर न्यायायलयात दाखल केले. त्यानुसार न्यायालयाने त्याला १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्याने धुमाळ यास नोकरी मिळविणे तसेच पासपोर्ट काढताना अडथळा निर्माण होणार असल्याची माहीती पोलिसानी दिली. लॉकडाऊन दरम्यान नागरिकांनी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे तसेच विनाकारण रस्त्यावर फिरू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.