नवी दिल्ली :- राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी 13 पाकिस्तानी नागरिकांविरोधात आरोपपत्र दाखल केले. गुजरातमधील शस्त्रास्त्र आणि अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी ते पाऊल उचलण्यात आले. ज्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाले; त्यांच्यापैकी 10 जणांना मागील वर्षी डिसेंबरमध्ये अटक करण्यात आली.
गुजरात दहशतवादविरोधी पथक आणि तटरक्षक दलाने मागील वर्षाच्या अखेरीस महत्वाची मोहीम राबवली. त्यावेळी समुद्रात एक पाकिस्तानी नौका ताब्यात घेण्यात आली. त्या नौकेत हेरॉईन, पिस्तुलांचे साठे सापडले.
नौकेतून प्रवास करणाऱ्या 10 पाकिस्तानींना अटक करण्यात आली. त्या कारवाईमुळे पाकिस्तानातून तस्करीमार्गे शस्त्रास्त्र आणि अंमली पदार्थ पाठवून दहशतवादी संघटनांना पैसा उपलब्ध करण्याच्या कटाचा पर्दाफाश झाला.
राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय लागेबांधे यांच्याशी निगडीत असल्याने संबंधित प्रकरण अतिशय गांभीर्याने घेण्यात आले. त्यातून केंद्रीय गृह मंत्रालयाने चालू वर्षी मार्चमध्ये एनआयएकडे तपास सोपवला. आता त्या केंद्रीय यंत्रणेने अहमदाबादमधील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.