नाशिक – काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरातील ड्रेसकोडच्या (वस्त्र संहिता) फलकावरुन मोठा वाद निर्माण झालेला. त्यानंतर नागपुरातील चार मंदिरांमध्ये वस्त्र संहिता म्हणजेच ड्रेस कोड लागू करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र मंदिर महासंघाने एक घोषणा केली होती. महाराष्ट्रातील सर्व मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू झाली पाहिजे, अशी मागणीही महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवी मंदिरात येणाऱ्या भाविकांना वस्त्रसंहिता लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यावर मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे हा मूर्खपणा आहे, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे.
“तुम्ही वाटेल तसे कपडे घालून मंदिरात जाऊ नये हे मलाही मान्य आहे. पण अगदी सगळ्यांनाच नियम पाळायचा असेल तर मंदिराच्या गाभाऱ्यात जे उघडेबंब असणारे पुजारी असतात त्यांनीही सदरा घालावा. गळ्यात माळ घातल्यावर कळेल हा पुजारी आहे. पुजारीही अर्धनग्नच नसतात का? धोतर नेसावे, सदरा घालावा, तुळशीमाळा घालावी त्यावरुन पुजारी असल्याचे ओळखू येईल,” असे छगन भुजबळ म्हणाले.
‘लोकशाहीत आपण नव्हे तर जनता राजा’
छगन भुजबळ यांनी काल नव्या संसदेचे उद्घाटन प्रकरणावरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका केली आहे. “संसद हे लोकशाहीचे मंदिर आहे. राम मंदिर, शिव मंदिरात धार्मिक विधी केल्या असता तर त्याला काहीच हरकत नव्हती. मात्र, सर्व देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लोकशाहीच्या मंदिरात असे करणे चुकीचे आहे. लोकशाहीत आपण नव्हे तर जनता राजा असते, याचे भान असले पाहिजे. आपण जे करत आहोत ते जगही पाहत आहे, हे देखील कळत नाही का? देशासाठी महत्त्वाचा असणारा हा कार्यक्रम वेगळ्या प्रकारे करता आला असता.”