- महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नव्या चेहऱ्यांना संधी
हिंजवडी – अनेक वर्षांपासून मुळशीकरांचे स्वप्नवत असलेल्या मुळशी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी पंधरा जणांच्या अशासकीय प्रशासक मंडळाला राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. भोर, वेल्हा, मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांची मुख्य प्रशासक तर मुळशीतील दगडू नामदेव करंजावणे यांची उपमुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाने याबाबतचे पत्र पुणे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांना पाठविले आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा मुळशीची स्वतंत्र बाजार समिती गठीत झाली आहे. यापूर्वी मुळशी हवेली अशी संयुक्त बाजार समिती कार्यान्वित होती. त्यामुळे मुळशीची स्वतंत्र बाजार समिती स्थापन व्हावी, अशी तालुक्यातील नागरिकांची मागणी होती. त्यानुसार नियुक्त केलेल्या समितीत शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे.
नव्याने नियुक्त केलेल्या संचालकांची नावे पुढीलप्रमाणे –
पांडुरंग राक्षे (माण), भगवान नाकती (दखणे), सुनील वाडकर (कासार आंबोली), भरत मारणे (मारणेवाडी), शिवाजी बुचडे (मारुंजी), चंद्रकांत पवार (ताथवडे), दादाराम मांडेकर (चांदे), राम गायकवाड (कासार आंबोली), नागेश साखरे (हिंजवडी), अमोल मोकाशी (बावधन), तुषार पवळे (पिरंगुट), शिवाजी तांगडे (भूगाव), संदीप केदारी (करमोळी).
या वेळी आमदार संग्राम थोपटे म्हणाले, आघाडीचे सरकार असल्याने या समितीत काम करण्याची संधी सर्वांना दिली आहे. शासनाने मुळशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासकांच्या नियुक्तीला आज मान्यता दिली असून, सर्व तांत्रिक व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा उपनिबंधकांकडे ही समिती लवकरात लवकर स्थापन केली जाणार आहे. गेले अनेक वर्षे बाजार समितीचा प्रश्न रेंगाळत पडलेला होता. तो आता सर्वांना विश्वासात घेऊन मार्गी लावू. ताथवडे येथे गायरान लगत बाजार समितीची नियोजित जागा असून, त्या जागेचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असून, तोही लवकरात लवकर मार्गी लावणार आहोत.