सातारा – कास तलावात जेटी बांधून सुरक्षित बोटिंगची सुविधा निर्माण झाल्यास पर्यटकांना नौकानयनाचा आनंद लुटता येणार आहे. त्याचबरोबर कास धरण विस्तार करताना ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होणार आहे. म्हणून नगरपालिकेच्या बोटिंग प्रस्तावास मान्यता द्यावी, तसेच कास तलाव परिसरातील निर्सगसंपदेचा सुयोग्य वापर करुन आधुनिक पद्धतीचे उद्यान उभारणीच्या प्रस्तावास मंजुरी देऊन अपेक्षित सुमारे 15 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे समक्ष भेटीमध्ये केली.
सातारा शहराच्या पाण्याची तहान भागवणारा कास तलाव सातारा नगरपालिकेच्या मालकीचा आहे. याठिकाणी अनेक सातारकरांसह महाराष्ट्रातील तसेच भारतातील पर्यटक कास पठाराबरोबरच कास तलावाला भेट देत असतात, असे नमूद करुन खासदार भोसले यांनी लोढा यांना निवेदन दिले. त्यानुसार ही मागणी करण्यात आली. कास तलावाची उंची वाढवण्यात आली असून 12 मीटर उंचीच्या तलावात सुमारे 0.5 टीएमसी पाणीसाठा होत आहे. त्यामुळे तलावाची पूर्वीची रुंदी व लांबी निश्चितच वाढली आहे. येथील स्थानिकांच्या उदरनिर्वाहाच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. अशा परिस्थितीत पर्यटकांना नौकानयनाचा निखळ आनंद मिळण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगाराचे नवीन उपलब्धी निर्माण करण्यासाठी नगरपालिकेच्या कास तलावात सुरक्षित बोटिंग सुरु करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दयावी. बोटिंगच्या सुविधा निर्माण झाल्यास पर्यटकांना एक नवीन पर्वणी मिळण्याबरोबरच रोजगार आणि अनुषंगिक विकासाला गती मिळणार असल्याचे उदयनराजे भोसले यांनी लोढा यांना सांगितले.
कास परिसरातील उद्यानाचा प्रस्ताव
कास परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. परिसरातील निसर्गसंपदेचा सुयोग्य वापर व रक्षण करुन याठिकाणी आधुनिक पध्दतीने सुशोभित गार्डन आणि प्रेक्षा गॅलरी उभारण्याचे नगरपालिकेने प्रस्तावित केले आहे. प्रेक्षा गॅलरीमुळे नयनरम्य आणि निसर्गाची मुक्त उधळण असलेला हा सर्वांगसुंदर परिसर पर्यटकांना आणि भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस डोळयात साठवून ठेवता येणार आहे.
तसेच सर्व सुविधांयुक्त उद्यान उभारण्यासाठी पर्यटन खात्याकडून 15 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, लोकहिताच्या आणि विकासाला नवी दिशा देणाऱ्या या दोन्ही प्रस्तावांवर विशेष लक्ष घालून जलद गतीने मंजुरी देण्याची कार्यवाही करु असे आश्वासन मंगलप्रभात लोढा यांनी भोसले यांना दिले. सुमारे तासभर झालेल्या या चर्चेच्या वेळी मुख्याधिकारी व प्रशासक अभिजित बापट, माजी उपनगराध्यक्ष ऍड. डी. जी. बनकर, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे उपस्थित होते.