पिंपरी – जी-20 च्या पार्श्वभूमीवर डिजिटल अर्थव्यवस्था कार्यकारी गटाच्या पुण्यात आयोजित केलेल्या तिसऱ्या बैठकीत विविध देशांच्या प्रतिनिधींना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध डिजिटल उपक्रमांची माहिती देण्यासाठी स्टॉल उभारण्यात आला आहे. या स्टॉलला विविध मान्यवरांनी भेट देऊन उपक्रमांचे कौतुक केले.
जी-20 च्या पार्श्वभूमीवर डिजिटल अर्थव्यवस्था कार्यकारी गटाची तिसरी प्रत्यक्ष बैठक सोमवारी (दि.12) पुण्यातील हॉटेल जे डबल्यू मॅरीएट येथे सुरू झाली. या बैठकीचे उद्घाटन कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय, भारत सरकारचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते व जी 20 च्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत संपन्न झाले. पुण्यात 3 दिवस चालणाऱ्या या जी-20 परिषदेमध्ये विविध देशांच्या प्रतिनिधींना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध डिजिटल उपक्रमांची माहिती देण्यासाठी स्टॉल उभारण्यात आला आहे.
या स्टॉलला भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अलकेश कुमार शर्मा, विभागीय आयुक्त सौरव राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार सिंह यांनी भेट दिली.
महापालिकेच्या विविध डिजिटल उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, अभिजित पाठक, अनुराग तिवारी, आनंद सिंग ठाकूर, बिनिश सुरेंद्र, सुरभी सिंह आदी उपस्थित होते. दिवसभरात विविध देशांच्या प्रतिनिधींनी मनपाच्या स्टॉलला भेट देऊन डिजिटल उपक्रमांची माहिती घेतली तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या डिजिटल उपक्रमांचे कौतुक देखील केले.