पुणे – केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयकपदी ओंकार जोशी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.लोकेशकुमार प्रजापती यांनी जोशी यांना दिल्ली येथे नियुक्तीचे पत्र दिले.
राज्यातील पिडीत व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे, तसेच मागासवर्गीय संस्था, संघटना यांच्याशी संपर्क कायम ठेवून त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेत त्या सोडविणे, त्यांची सद्यस्थिती व निराकण करण्यावर भर देणे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे त्याबाबत आवश्यक इत्यंभुत माहिती देणे, या स्वरुपाच्या कामाची जबाबदारी जोशी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच विविध विकासाभिमुख योजना तळागाळापर्यंत पोचविण्याचेही कामही त्यांच्यावर सोपविले आहे.
डॉ.प्रजापती यांनी जोशी यांना दिल्ली येथे नियुक्तीपत्र दिले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे कार्यालयीन अधिक्षक संदिपकुमार दक्ष यांनी जोशी यांना शुभेच्छा दिल्या. जोशी यांनी आत्तापर्यंत सामाजिक कार्यामध्ये सक्रीय सहभाग घेत विविध प्रकारचे विधायक उपक्रम राबविले आहेत.