फोन चार्जिंग सुरू असताना त्याच्या जवळ झोपल्याने अपघात झाल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. या संदर्भात अनेक अभ्यासही समोर आले आहेत, ज्यानुसार चार्जिंग सुरू असताना फोन जवळ झोपणे धोकादायक आहे. त्यामुळे अपघात होऊ शकतो, तसेच आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. अॅपलनेही आता याबाबत स्पष्ट इशारा दिला आहे. कंपनीने काय सूचना दिल्या आहेत ते जाणून घेऊया..
आयफोन बनवणाऱ्या अॅपल कंपनीने स्पष्टपणे चेतावणी दिली आहे की, वापरकर्त्याने फोन चार्ज होत असताना त्याच्या जवळ झोपू नये. यामध्ये विशेषत: अशा लोकांसाठी इशारा देण्यात आला आहे ज्यांना चार्जिंग सुरू असताना फोन वापरण्याची किंवा त्याच्याजवळ झोपण्याची सवय आहे. अॅपलच्या ऑनलाइन यूजर गाइडमध्ये हा इशारा देण्यात आला आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, आयफोन फक्त हवेशीर वातावरणातच चार्ज केला जावा ज्यामध्ये टेबलसारख्या सपाट पृष्ठभागावर फोन असेल. म्हणजेच फोन ब्लँकेट, चादर किंवा कोणत्याही वस्तूवर किंवा शरीरावर ठेवून चार्ज करू नये.
अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, आयफोन चार्जिंगदरम्यान उष्णता निर्माण करतो. जर ही उष्णता बाहेर पडू शकली नाही, तर ती बर्न किंवा आगीचा धोका निर्माण करू शकते. उशीखाली ठेवून फोन चार्ज करणे सर्वात घातक ठरू शकते, फोन चार्ज करण्याचा हा सर्वात असुरक्षित मार्ग असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
मुख्य मेसेजमध्ये कंपनीने म्हटले आहे की, पॉवर सोर्स, पॉवर अॅडॉप्टर, वायरलेस चार्जर ब्लँकेट, उशाखाली ठेवू नका. आयफोन, पॉवर अॅडॉप्टर आणि वायरलेस चार्जर हवेशीर क्षेत्रात साठवा. कोणत्याही उपकरणातून उष्णता बाहेर पडण्याची समस्या येत असेल तर अशा वेळी विशेष काळजी घ्या. जास्त आर्द्रता असताना खराब केबल किंवा चार्जर वापरू नका असा सल्लाही कंपनीने दिला आहे.