पुणे : शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन किंवा इतर कारणांसाठी आज आणि पूर्वी दाखल केलेल्या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. न्यायालयातील मराठी ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
संबंधित कर्मचाऱ्याकडे सर्व अर्ज दाखल करण्यात येत असतात. या अर्जांच्या माध्यमातून करोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित कर्मचाऱ्याकडे दाखल झालेले सर्व अर्ज 24 ते 36 तासानंतर संबंधित न्यायालयात सुनावणीसाठी पाठवले जाणार आहे. त्यानंतर त्यावर योग्य तो निकाल होईल.
याबाबत पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक यांनी सांगितले की, त्या कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याचे सोमवारी उघड झाले. त्यानंतर त्वरित कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्या ठिकाणी दाखल असलेले अर्ज बुधवारी संबंधित न्यायालयात पाठवले जाणार आहेत. त्यामुळे ज्या वकिलांच्या पक्षकारांचे अर्ज दाखल आहेत किंवा ते दाखल करणार आहेत, त्यांनी सहकार्य करावे. सोमवार आणि त्या पूर्वीचे अर्ज मार्गी लागल्यानंतर पुन्हा सर्व सुरळीत होईल.