मुंबई – बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्माने लेक वामिकाच्या जन्मानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. अभिनेत्रीचा ‘चकदा एक्सप्रेस’ हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुष्काने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. अनुष्काने वामिकाला जन्म दिल्यानंतर काही काळासाठी चित्रपटातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर अभिनेत्री पुन्हा आता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री अनुष्का एका महिला क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांच्यावर आधारीत ‘चकदा एक्सप्रेस’ हा बायोपिक येणार असून या चित्रपटामध्ये अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्रीने या चित्रपटासाठी तयारी सुरू केली असून, ट्रेनिंगचा व्हिडीओ देखील चाहत्यांसोबत शेअर केला होता. व्हिडीओमध्ये ती क्रिकेट पीचवर घाम गाळताना दिसली होती. मात्र, आता तिने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमधील तिच्या लूकने अनेकांचे लक्ष वेधले आहे. झूलन गोस्वामी या एक फास्ट बॉलर आहेत. अनुष्काच्या चकदा एक्सप्रेस या चित्रपटाचे शूटिंग भारताबरोबरच यूकेमध्ये देखील होणार आहे. या चित्रपटाची निर्मीती अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसने म्हणजेच क्लीन स्लेट फिल्म यांनी केली आहे. या प्रोडक्शन हाऊसने ‘एनएच 10’ आणि ‘परी’ या चित्रपटांची देखील निर्मिती केली आहे.